पुणे : आरक्षणाच्या मागणीसाठी चाकणमध्ये झालेल्या मराठा आंदोलनादरम्यान सोमवारी (दि. ३०) पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या नऊ बस जाळण्यात आल्या आहेत. तर चार बसेसची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे दुपारनंतर चाकण व राजगुरूनगरला जाणाऱ्या बसेसच्या सर्व फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. चाकणमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी बंद पाळण्यात आला. मात्र, या बंदला हिंसक वळण लागल्याने वाहनांची तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या. त्याचा सर्वाधिक फटका पीएमपीला बसला आहे. चाकण, राजगुरूनगर या भागात पीएमपीकडून दररोज अनेक फेऱ्या केल्या जातात. हे मार्ग पीएमपीसाठी फायदेशीर ठरतात. प्रवाशांकडूनही या मार्गांवर पीएमपीला पसंती दिली जाते. मात्र, सोमवारच्या आंदोलनामुळे पीएमपीला मोठा आर्थिक फटका बसला. भोसरी, पिंपरी, पुणे स्टेशन, पीएमपी, मनपा यांसह अन्य काही आगारांमधून चाकणलला बस सोडल्या जातात. त्यानुसार सकाळच्या सत्रात नियमितपणे बस सोडण्यात आल्या. मात्र, आंदोलन चिघळल्याने दुपारी बारा वाजल्यानंतर या मार्गावरील संचलन पूर्णपणे बंद करण्यात आले. पीएमपीचे महाव्यवस्थापक विलास बांदल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणमध्ये आंदोलनादरम्यान पीएमपीच्या एकुण १३ बसेसला फटका बसला आहे. त्यापैकी ९ बस जाळण्यात आल्या असून उर्वरीत चार बससेची तोडफोड करण्यात आली. नऊ बसेसपैकी सात बस पीएमपीच्या मालकीच्या तर दोन बस भाडेतत्वावरील आहेत. या सर्व बस भोसरी आगाराच्या आहेत. या आगारातील एक बस फोडण्यात आली आहे. तर पिंपरी व हडपसर आगारातील अनुक्रमे २ व १ बसची तोडफोड करण्यात आली. सुदैवाने यामध्ये बसचे चालक व वाहक यांच्यासह प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नाही. आंदोलकांकडून प्रवाशांना खाली उतरवून बस पेटविण्यात आल्या. या घटनांमुळे दिवसभरातील सर्व फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. केवळ भोसरीपर्यंतच संचलन सुरू ठेवण्यात आले.दरम्यान, बस जाळण्यात आल्याने पीएमपीला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात आधीच बसेसची संख्या कमी आहे. त्यातच बसेस जाळणे, तोडफोडीच्या घटना घडल्याने संचलनावर परिणाम होणार आहे. सोमवारच्या घटनेच्या पार्श्वभुमीवर मंगळवारी चाकण व परिसरात बस संचलन सुरू ठेवण्याबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चाकणमध्ये मराठा आंदोलनादरम्यान पीएमपीच्या नऊ बस जाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 9:29 PM
चाकणमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी बंद पाळण्यात आला. मात्र, या बंदला हिंसक वळण लागल्याने वाहनांची तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या. त्याचा सर्वाधिक फटका पीएमपीला बसला आहे.
ठळक मुद्देआंदोलन चिघळल्याने दुपारी बारा वाजल्यानंतर या मार्गावरील संचलन पूर्णपणे बंद पीएमपीच्या ताफ्यात आधीच बसेसची संख्या कमीआंदोलनाच्या पार्श्वभुमीवर मंगळवारी चाकण व परिसरात बस संचलन सुरू ठेवण्याबाबत परिस्थितीनुसार निर्णय