पुणे : कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘समर्थ भारत’ तर्फे कोरोना काळात समर्थ भारत पुनर्बांधणी योजनेची सुरुवात केली. ‘समर्थ भारत’तर्फे पुण्यात नऊ कोव्हिड केअर सेंटर उभारली. पहिले कोविड केअर सेंटर गरवारे महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू झाले. पाच लाख लोकसंख्येसाठी एक कोविड केअर सेंटर अशा अंदाजाने ९ कोविड केअर सेंटर उभारण्यात आली.
कोरोना आपत्तीमध्ये मानसिक स्वास्थ उत्तम राखण्यासाठी बाधित नागरिक व कुटुंबासाठी समुपदेशन केंद्र सुरू केली आहेत. ज्याव्दारे समुपदेशक मानसिक, भावनिक आधार देण्याचे काम करीत आहेत. यात आतापर्यंत ११ महिलांसह ६३ हून अधिक समुपदेशकांकडून शंभरपेक्षा अधिक कुटुंबातील २०० हून अधिक नागरिकांचे, ४०० बँक कर्मचारी, २०० विद्यार्थी ऑनलाइन समुपदेशन केले आहे.
समर्थ भारत पुनर्बांधणी योजना कौशल्य विकास व प्रशिक्षण, औद्योगिक, आरोग्य, शिक्षण, समुपदेशन या पाच गटात राबविली गेली. समर्थ भारत पुनर्बांधणी योजनेचे तीन स्तर केले असून यामध्ये मार्गदर्शक मंडळात अनेक मान्यवरांचा सक्रिय सहभाग आहे. या योजनेच्या नियोजन, सुसूत्रीकरण, समन्वयासाठी महानगर सुकाणू समिती व क्रियान्वयन, अंमलबजावणीसाठी भाग कार्यकारी समिती अशी त्रिस्तरीय रचना करण्यात आली आहे. या त्रिस्तरीय रचनेबरोबरच विविध स्वयंसेवी संस्था, साधन संस्था, धर्मादाय सेवा संस्था, समाज समूह, शासन प्रशासन यांचा स्थानिक स्तरावरील समन्वय साधून हे काम सुरू आहे.