चाकण : येथील चाकण नगर परिषदेच्या सफाई कामगारास मानसिक छळ देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नगरपरिषदेच्या तीन कामगारांसह एकूण नऊ जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार सी. एम. गवारी यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जून रोजी सकाळी सहा वाजता अनिल चिमाजी धोत्रे ( वय ४६, रा. खंडोबा माळ, चाकण ) हा सफाई कामगार वायसीएम रुग्णालयात उपचार चालू असताना मृत झाला. त्यांची पत्नी शांताबाई अनिल धोत्रे यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार चालू असून त्यांची परिस्थिती गंभीर आहे. या दाम्पत्याने १२ जून रोजी मानसिक छळाला कंटाळून फोरसन कीटक नाशक हे विषारी औषध प्राशन केले होते. त्यांचा मुलगा अविनाश अनिल धोत्रे ( वय २२, रा. खंडोबा माळ, चाकण ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चाकण नगरपरिषदेचे कर्मचारी विजय भोसले, मंगल गायकवाड, संगीता घोगरे ( सर्व रा. आंबेडकरनगर, चाकण ) तसेच फिर्यादीची पत्नी कोमल, सासरा शाम बाबू मंजुळे, सासू सुनीता, चुलत सासरा रमेश बाबू मंजुळे, चुलत सासू छाया, मेव्हुणा राजू ( सर्व रा. पनवेल, जि.रायगड ) असा एकूण नऊ जणांवर गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६८/१८, भादंवि कलम ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अविनाश धोत्रेने दिलेल्या फिर्यादीवरून याबाबतची अधिक माहिती अशी की, शांताबाई व अनिल हे दोघे चाकण नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून काम करीत असे. फिर्यादी अविनाशचे ११/१२/२०१६ रोजी पनवेल येथील कोमल हिच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर दोनच महिन्यात कोमलने घरात सतत भांडण करून, शिवीगाळ करून माहेरी निघून गेली. तिला आणण्यासाठी गेले असता कोमल व नातेवाईकांनी भांडण केले. तसेच अविनाशची पत्नी कोमल हिने हुंड्यासाठी छळ केल्याबाबतचा चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोटगीसाठी पनवेल कोर्टात केस टाकून वकिलाकडून नोटीस देऊन दहा लाखाची मागणी केली होती. कोमल व कुटुंबीयांनी कोर्टात व घरी वेळोवेळी अविनाश व त्याच्या आई वडिलांचा अपमान केला होता. आर्थिक परिस्थिती हलाकीची असताना त्यांचा मानसिक छळ होत होता. त्यांनी मागितलेल्या भरपाई ते दाम्पत्य कायम टेन्शनमध्ये होते.त्यातच चाकण नगर परिषदेत काम करीत असलेल्या ठिकाणी मुकादम विजय भोसले, मंगल गायकवाड हे नेहमी कामगारांसमोर अपमानास्पद वागणूक देत होते. संगीता घोगरे ह्या सुपरवायझर ला चुगल्या लावून चेष्टा करीत होती. काम नीट करीत नसलेबाबत त्यांना दोन नोटीसही दिल्या होत्या. तर विजय भोसले याने अविनाशच्या आई-वडिलांचे पगार थांबवले होते. फिर्यादीची पत्नी कोमल, त्यांचे कुटुंबीय व नगर परिषदेचे कामगार यांच्या मानसिक छळाला कंटाळून या दाम्पत्याने १२ जून रोजी विषारी औषध प्राशन केले. यामध्ये उपचार चाकू असताना वडील अनिल यांचा मृत्यू झाल्याने वरील नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत पवार पुढील तपास करीत आहेत.
सफाई कामगार दाम्पत्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नगरपरिषदेच्या तीन कामगारांसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 7:30 AM