पुणे : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणार्या 50 व्या फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नऊ संघाची निवड झाली आहे. सामाजिक - आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमीनिर्मित आणि एचसीएल फाउंडेशन, पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्याने होणार्या या स्पर्धेची प्राथमिक फेरी 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान अण्णा भाऊ साठे सभागृहात उत्साहात पार पडली. वेगळ्या धाटणीचे विषय, वेगळी मांडणी अन् तरुण कलाकारांचे उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळवली. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी नऊ संघ निवडले गेले आहेत.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ (मिन्को), पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (यांत्रिक), स. प. महाविद्यालय (बचके रेहना रे बाबा), विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (पूरब को द्वार), डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी (राह...), एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय (सिने-मेटस्), एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (रहनुमा), मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय (टेम्पल रन) आणि पीईएस मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय (जोर लगाके हाईश्श्या) या संघांनी प्राथमिक फेरीत बाजी मारून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण 30 महाविद्यालयांनी सहभाग घेतला. सुखदा खांडकेकर, धीरेश जोशी, सिद्धार्थ केळकर, अमीरा पाटणकर आणि देवेंद्र भोमे यांनी प्राथमिक फेरीचे परीक्षण केले. स्पर्धेची अंतिम फेरी 24 आणि 25 फेब्रुवारीला अण्णा भाऊ साठे स्मारक सभागृहात होणार आहे. -