ना मास्क, ना सॅनिटायझर, ना सोशल डिस्टन्स
महेश जगताप : सोमेश्वरनगर
एकीकडे राज्यात कोरोनाने थैमान घातलेले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अस्वस्थता वाढत असताना मात्र सोमेश्वर करखान्यावरील तब्बल ९ हजार ऊसतोडणी कामगारांना आणि ट्रक, ट्रॅक्टरचालकांपर्यंत अजून कोरोना शिवलाच नाही, हे एक आश्चर्य तर आहेच, शिवाय संशोधनाचा देखील भाग आहे.
बारामती तालुक्यात दररोज ४०० च्या आसपास कोरोनाचे बाधित रुग्ण सापडत आहेत. तालुक्यात आज एकपण असे गाव नाही की तिथे कोरोनाचा रुग्ण नाही. मात्र, याला सोमेश्वर करखान्यावरील ९ हजार ऊसतोडणी कामगारांची वसाहत अपवाद आहे. सोमेश्वर साखर कारखाना अजून सुरू आहे. अजून १५ दिवस सोमेश्वर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू राहणार आहे. मात्र, कारखाना स्थळावर मुक्कामी असलेले तब्बल ९ हजार ऊसतोडणी कामगारांना कोरोनाचे काहीही सुख-दु:ख नाही. एकही ऊसतोडणी कामगार मास्क वापरत नाही, एक ही कामगार सॅनिटायझर वापरत नाही, तर इतर कुठलीही स्वछता नाही. तरीदेखील कोरोना या लोकांना अजूनपर्यंत शिवू शकला नाही. रोज पहाटे ४ ला उठायचे, ऊस तोडायचा, गाड्या भरून कारखान्यावर यायचं... हा रोजचाच या कामगारांचा कार्यक्रम...ना स्थानिक लोकांच्यात मिसळायचं, ना स्थानिक लोकांच्या संपर्कात यायचं...त्यांचं विश्वच वेगळं.. ऊसतोडणी कामगारांची वसाहत ही वेगळी आहे. त्यांची किराणा मालाची दुकानं वेगळी.. हॉटेल वेगळी.. केशकर्तनालाय वेगळी.. तर मुलांची शाळा पण वेगळी.. त्यामुळे हे लोक स्थानिक बाजारपेठ तसेच स्थानिक नागरिकांच्या फार कमी प्रमाणात मिसळतात.
राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला असला तरी अजून राज्यातील ३६ कारखान्यांची धुराडी अजून सुरू आहेत. दसरा संपला की हे ऊसतोडणी कामगार बीड, नाशिक, नगर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतून हे ऊसतोडणी कामगार साखर कारखान्यांवर हजर होत असतात. गेल्यावर्षी देखील चालू साखर हंगामात केंद्र सरकारने लॉकडाऊन केल्यामुळे कारखानदारांना या ऊसतोडणी कामगारांना किराणामाल पुरवावा लागला आहे. देशात लॉकडाऊन झाल्यामुळे आम्हाला पण घरी जाऊ द्या, अशी मागणी अनेक साखर कारखान्यांवरील ऊसतोडणी कामगारांनी केली होती. मात्र, यावर्षीची चित्र उलटे दिसत आहे. दुसरीकडे घरात बसा असे आवाहन केले जात असताना ऊसतोडणी कामगार आपले रोजचे काम करत बिनधास्त जगत आहे.
————————————————
सोमेश्वर कारखाना गेली सहा महिने सुरू असून, अजून एकाही ऊसतोडणी कामगारांना कोरोनाची लागण झाली नाही. कारखान्याकडे अजूनतरी अशी कोणतीही नोंद नाही.
बापूराव गायकवाड
शेतकी अधिकारी सोमेश्वर कारखाना
—————————————————
इळभर ऊस तोडाय जातो... कशाचा कोरोना आणि कशाच काय? दिसभर कष्ट करावं लागतं. आमी जास करून स्थानिक लोकांच्यात मिसळत नाही. आमचं काम भलं आणि आमी भलं.
रोहिदास कौटेकर, पिटी नायगाव, पाटोदा
———————————————————
आमच्याकडे मोबाईल नाय, टीव्ही नाय, त्यामुळे बाहेर काय चाललंय ते आमाला समजतंच नाय. त्यांच्याकडे पैसा हाय ते भित्यात मरणाला. दिवसभर रगात गळायचं तेव्हा पोटाला चटणी-भाकरी मिळतीया.
रघुनाथ तोडेकर, मेंगलवाडी, जिल्हा बीड
————————————————