कोरोना रुग्णांचे सुरुवातीपासून जास्त प्रमाण असलेल्या सासवड व जेजुरी या नगरपालिकाप्रमाणे ग्रामीण भागातील पिसर्वे, धालेवाडी, बेलसर, नाझरे (क. प.), पिंपरे (खुर्द), राख, माळशिरस, वाल्हे, पिंपरी ही नऊ गावेही हायअलर्टमध्ये आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यातील दिवे, निरा, कोळविहिरे, वाघापूर, वीर, झेंडेवाडी, काळदरी, पारगाव, परिंचे, गुळुंचे ही दहा गावे अलर्ट म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
यामध्ये तालुक्यातील दक्षिण-पूर्व पट्ट्यातील निरा-कोळविहिरे जिल्हा परिषद गटातील सर्वाधिक आठ गावांचा समावेश आहे. पूर्वभागातील बेलसर - माळशिरस जिल्हा परिषद गटातील सहा गावे, उत्तर भागातील दिवे - गराडे भागातील तीन गावांचा, तर पश्चिम भागातील वीर - भिवडी जिल्हा परिषद गटातील दोन गावे हाय अलर्ट किंवा अलर्ट गावे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
या १९ गावांसह दोनही नगरपालिकांच्या ठिकाणी तालुका व स्थानिक प्रशासनाने आवश्यक त्या कोरोना प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सूचना केल्या आहेत. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी वरील सर्व ग्रामपंचायतींना भेट देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे. सर्व गावस्तरीय समित्या कार्यान्वित कराव्यात व त्यांना मार्गदर्शन करावे, तसेच कामाचे वाटप योग्य प्रकारे झाले आहे का? याची खात्री करावी, पोलीस विभागाने वरील ग्रामपंचायत क्षेत्रात पाळत वाढवावी जेणेकरून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होण्यास मदत होईल. तसेच या सर्व गावांमध्ये लसीकरण लवकर पूर्ण होईल, याप्रमाणे नियोजन करावे. जेणेकरून कोविड-१९ चा संसर्ग आटोक्यात आणणे शक्य होईल, असे सूचनेत नमूद केले आहे.