पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विधी समितीने नगसेवकांचे मानधन पन्नास हजार करावे, असा ठराव मंजूर केला आहे. १२८ नगरसेवकांपैकी सुमारे नव्वद टक्के नगरसेवक हे कोट्यधीश आहेत. श्रीमंत महापालिकेचे नगरसेवकही श्रीमंत आहेत. त्यामुळे या नगरसेवकांना वेतनवाढ हवी कशाला, असा प्रश्न या शहरातील सुजाण नागरिकांनी केला आहे.विधानसभा आणि विधान परिषद सभासदांच्या मानधनात झालेल्या भरीव मानधनाच्या धर्तीवर महापालिका सदस्यांच्या मानधनातही वाढ करावी. सात हजारांहून पन्नास हजार करावे, पदाधिकाऱ्यांच्या पदानुसार मानधनात द्यावी, माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन सुरू करावे, असे ठराव पाच आॅगस्टला झालेल्या विधी समितीच्या सभेत मंजूर केले आहेत. (प्रतिनिधी)विशेष म्हणजे महापालिकेतील नव्वद टक्के नगरसेवकांकडे स्वत:ची चारचाकी आणि दुचाकी वाहने आहेत. तसेच काहींकडे हमर, बीएमडब्यू, स्कोडा, जगवार, हंटर, सियाझ, कोरोला, मर्सिर्डीस अशा आलिशान गाड्या, तसेच होंडा सीटी, महिंद्रा एक्सयू व्ही, मारुती डिझायर, सफारी, स्कॉर्पिओ, इनोव्हा, आय २० अशी चारचाकी वाहने आहेत. तर यातील पन्नास टक्के नगरसेवकांचे स्वत:चे व्यवसाय आहेत. तर पंचवीस टक्के नगरसेवकांचा बांधकाम हा व्यवसाय आहे. महापालिकेत १२८ नगरसेवक आणि ५ स्वीकृत असे १३३ सदस्य आहेत. सध्या नगरसेवकांना प्रतिमहिना सात हजार वेतन दिले जाते. नवीन वेतनवाढीनुसार महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे सात कोटींचा भार पडणार आहे. महापालिकेत सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसचे ८३, काँग्रेसचे १३, शिवसेनेचे १५, मनसेचे ४, भाजपाचे ३, अपक्ष १०, रिपब्लिकन आघाडी १ असे पक्षीय बलाबल आहे. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष आघाडी अशा ७० नगरसेवक, काँग्रेसचे १०, शिवसेनेचे ०९, भाजपाचे २ नगरसेवक कोट्यधीश आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजपा, रिपब्लिकन आघाडी, मनसे आणि अपक्ष असे उर्वरित सर्व नगरसेवक लक्षाधीश आहेत.
महापालिकेचे नव्वद टक्के नगरसेवक कोट्यधीश
By admin | Published: August 13, 2016 5:12 AM