लोकमत ऑन द स्पॉट
-
रब्बी हंगाम : तुकईची भांबुरवाडीतील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
शेलपिंपळगाव : वाढत्या शहरीकरणामुळे एकीकडे तरुणाई शेती विकून शहराकडे जात आहेत. मात्र, काळ्या मातीला आईप्रमाणे जोपासत
जिद्द आणि अपार कष्टाला अनुभवाची साथ दिल्यास कमी शेती क्षेत्रातही जास्तीतजास्त आर्थिक उत्पन्न घेता येऊ शकते, हे एका नव्वदीतल्या तरुणाने यशस्वी करून दाखविले आहे. राजगुरूनगरनजीक तुकईची भांबुरवाडी (ता. खेड) येथील तुकाराम लक्ष्मण रोडे असे या नव्वदीतल्या तरुणाचे नाव असून, केवळ पाऊण एकर शेतात त्यांनी प्रतिकूल हवामानातही बटाट्याचे उत्पन्न घेतले आहे. यातून जवळपास २ लाख रुपयांचा निव्वळ नफा होणार असल्याची अपेक्षा तुकाराम रोडे यांनी केली आहे.
अडीच महिन्यांपूर्वी सरी पद्धत वापरून तुकाराम राेडे यांनी बटाटा पिकाची लागवड केली. हे पीक सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. सरी पद्धतीने लागवड केलेल्या पिकाला पाण्याचे, तसेच योग्य पाणी व खतांचा मात्रा दिल्याने, लागवडयुक्त बटाटा वाणाची व्यवस्थित उगवण झाली. दरम्यान, एका महिन्याच्या कालखंडात औषधांची मात्रा दिल्याने पिकाची रोगापासून मुक्तता होण्यास मदत झाली. यामुळे राेडे यांचा बटाट्याचा मळा चांगला बहरला आहे. बटाट्याच्या एका परिपक्व झाडाला १० ते १२ बटाटे लागले आहेत. त्यांचे वजनही जास्त असल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
येत्या आठ-दहा दिवसांत पिकाची काढणीस सुरुवात केली जाणार आहे. पाऊण एकरात दोनशे गोण्यांच्या उत्पादनाची अपेक्षा आहे. आजच्या बाजारभावानुसार अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळणार आहे. यामुळे उत्पादक रोडे आजोबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहवयास मिळत आहेत. दरम्यान, रोडे यांची बहरलेली बटाटा शेती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी गर्दी करत आहेत.
चौकट
खुब्याची शस्त्रक्रिया होऊनही यशस्वी शेती
तुकाराम राेडे यांचे दोन वर्षांपूर्वी खुब्याची शस्त्रक्रिया झाली आहे. या आजारातून बरे होत ते पुन्हा शेतीकडे वळले. रोडे यांना एक मुलगा आहे. मात्र, शेतात त्याला रस नसल्याने तो शहरात काम करतो. शेती ही शाश्वत राहिले नसल्याने अनेक तरुण शेती विकत आहेत. मात्र, योग्य नियोजन केल्यास अशाश्वत वाटणारी ही शेतीही एखाद्याला लखपती बनवू शकते. यामुळे तरुणांनी आधुनिकतेची कास धरून जमिनी न विकता शेती करावी, असा संदेश ते तरुणांना देत आहे.
फोटो ओळ : तुकईची भांबुरवाडी (ता.खेड) येथे बटाट्याची बहरलेली शेती दाखविताना तुकाराम रोडे. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)