पुणे : प्राथमिक शिक्षणाबरोबरच माध्यमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नववी व अकरावीच्या परीक्षेचे पेपर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काढण्याबाबत चाचपणी सुरू आहे. या परीक्षा संबंधित शाळेतच घेतल्या जातील. शासनाकडून मान्यता मिळाल्यास येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनी दिली.काही वर्षांपासून इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. याची वेगवेगळी कारणे असली, तरी आठवीपर्यंत परीक्षा नसल्याचेही एक कारण आहे. आठवी-नववीनंतर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही अधिक आहे. यामध्ये मुलींचे प्रमाण १२ टक्के असून, साधारण पाच लाख विद्यार्थ्यांची गळती होत असल्याचे समोर आले आहे. ही गळती रोखण्यासाठी माध्यमिक स्तरावरही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत दहावी-बारावीप्रमाणे नववी व अकरावीची परीक्षाही राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्याचा पर्याय पुढे आला. त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. नववी व अकरावीच्या परीक्षांचे पेपर मंडळाकडून तयार केले जातील. तर, या परीक्षा संंबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या पातळीवर घेण्यात येईल, असे नियोजन केले जात आहे. युडाएसची आकडेवारीनववीतील अनुत्तीर्ण२०१४-१५ : २ लाख ५९ हजार २०१५-१५ : २ लाख ४५ हजार नववीत अनुतीर्ण विद्यार्थ्यांपैकी दहावीची परीक्षा न दिलेले - १ लाख २५ हजार नववीत अनुत्तीर्ण होऊन थेट दहावी परीक्षा दिलेले व अनुत्तीर्ण झालेले - १ लाख ५० हजार.
नववी, अकरावीसाठीही बोर्डाची परीक्षा?
By admin | Published: June 05, 2016 4:06 AM