नीरा : नीरा शहरासह परिसरातील गावे कोरोनाची हाय अलर्ट गावे म्हणून घोषित झाल्याने, तसेच नीरा शहरात वाढत्या रुग्णसंख्या व वाढता मृत्यूदर लक्षात घेता नीरा आपत्ती व्यवस्थापन समितीने मंगळवारपासून कडक लॉकडाऊन करण्यचा निर्णय घेतला. या निर्णयाला नीरेकरांनी मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नीरा बाजरपेठ कडकडीत बंद ठेवत पुढल बुधवारपर्यंत असे प्रशासनाला साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला.
सोमवारी निरेतील मुख्य बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने पोलिसांनी बंद केली. बारापर्यंत सर्वत्र शुकशुकाट झाला होता. पण अहिल्यादेवी होळकर चौकातील एका कापड व्यावसायिकाने साडेबारा नंतरही ग्राहकांना दुकानात घेऊन दुकानाच्या शटरचे कुलूप बंद केले. याची माहिती नीरा पोलिसांना कळताच नीरा पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव तथा तलाठी बजरंग सोनवले, ग्रामसेवक मनोज डेरे, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, कोतवाल अप्पा लकडे यांच्यासमक्ष संबंधित दुकानाचे शटर उघडण्यास भाग पाडले. दुकानदारास कापड विक्री करताना रंगेहात पकडले. यानंतर पोलिसांनी या दुकानदारला ताब्यात घेत त्याच्यावर १८८ नुसार कारवाई केली. या कारवाईत सहायक फौजदार सुदर्शन होळकर, पोलीस नाईक राजेंद्र भापकर, पोलीस पो. का. हरिश्चंद्र करे यांनी सहभाग घेतला.
सोमवारच्या या धडक कारवाईचा धसका मंगळवारी इतर दुकानदारांनी घेतला. सीलबंदची कारवाई टाळायची असेल तर दुकाने बंद ठेवणे हा एकमेव पर्याय असल्याचे व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलून दाखवले.
पुढील आठ दिवस सर्व वित्तसंस्थांचे शटर बंद. नीरेतील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुढील आठ दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे. या मध्ये, राष्ट्रीयकृत बँक असलेली बँक ऑफ महाराष्ट्र, आय.डी.बी.आय. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी, बारामती अर्बन या मोठ्या बँक शाखांसह ३५ पतसंस्थांनी आपले शटर डाऊन केले होते. तर शेतीपूरक असलेली खतांची, औषधांची दुकाने बंद मध्ये सहभागी झाली आहेत.
मंगळवारपासून नीरा (ता. पुरंदर) येथे कडक लॉकडाऊन पाळला जाणार असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.