लोकमत न्यूज नेटवर्क
नीरा :
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मागील दोन आठवड्यांत नीरा शहर व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. यामुळे बेफिकीर होत नागरिक विनामास्क फिरत होते. यामुळे रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. सोमवारी नीरा शहरात ३ जण कोरोनाबाधित आढळले. वाढत्या रूग्णांचा धोका ओळखून नीरा शहरात पुन्हा नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
नीरा शहरात साेमवारी तीन रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. रविवारी शहरात ८ रुग्ण अॅक्टिव्ह होते. त्यात आता ३ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता एकूण ११ कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण शहरात झाले आहेत. बहुतांश रुग्ण हे बाजारपेठेतील किंवा व्यापरी आहेत. त्यामुळे नीरा पोलिसांनी रविवार पासूनच दंडात्मक कारवाईला सुरवात केली आहे. रविवारी छत्रपती शिवाजी चौक ते अहिल्यदेवी होळकर चौकातील व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दुकानाच्या दर्शनी भागात अंतर असावे म्हणून दोरी न बांधने, काऊंटरवर ग्राहकांसाठी सॅनिटायझर न ठेवणे, व्यापाऱ्यांनी मास्क न लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे अशी कारणे दाखवत नीरा पोलीस दूरक्षेत्रातील पोलीसांनी शासकीय पावती फाडून दंड वसुल केला. या धडक कारवाईने व्यावसायिकांचे तारंबळ उडाली. या कारवाईत नीरा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक कैल स गोतपागर, राजेंद्र भापकर, नीलेश जाधव, पोलीस मित्र रामचंद्र कर्णवर यांनी सहभाग घेतला.