पुणे : महाराष्ट्रातील धार्मिक सद्भाव, एकोपा आणि सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न झाला तर पुण्यामधील व राज्यातील सर्व जनता अशा उपटसुंभाचा रस्त्यावर उतरून संपूर्ण ताकदीने प्रतिकार करेल. हा निर्धार व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवार ३० एप्रिल २०२२ रोजी सायं. ५.०० वा लोकमान्य टिळक (अलका टॉकिज) चौक येथे महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस + राष्ट्रवादी काँग्रेस + शिवसेना तसेच डावे, पुरोगामी पक्ष संघटना यांच्या वतीने महाराष्ट्र सद्भावना निर्धार सभा आयोजित केली आहे. या सभेमध्ये राज्यपातळीवरील तसचे स्थानिक नेते सभेला संबोधित करतील. अशी माहिती पुणे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
देशामध्ये राज्यांची आर्थिक आणि राजकीय कोंडी करणारे निर्णय केंद्रामधील मोदी सरकार घेत आहे. त्यामधून घटनेमध्ये अपेक्षित असलेल्या संघराज्यात्मक लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लागत आहे. केंद्र सरकारची एक पक्षीय नोकरशाही व जुलूमशाही लादण्याचे उद्दीष्ट स्पष्टपणे दिसत आहे. संसदेमध्ये विरोधकांचा आवाज दडपून राज्यांचे करविषयक अधिकार, राज्यांचे करउत्पन्न, कामगार तसेच शेती विषयक कायदे, कायदा सुव्यवस्थेबाबतचे अधिकार तसेच नोकरशाहीवरील नियंत्रणाचे अधिकार अशा प्रत्येक बाबतीमध्ये महाराष्ट्राची जाणीवपूर्वक कोंडी केली जात आहे. राजकीय विरोधकांना दडपण्यासाठी केंद्रिय यंत्रणांचा बेबंद गैरवापर केला जात आहे. महाराष्ट्रातील जनता केंद्राची ही घटनाविरोधी दादागिरी सहन करणार नाही. हा निर्धार या सभेमधून व्यक्त केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजित अभ्यंकर, कामगार नेते नितीन पवार, सुराज्य सेनेचे सुभाष वारे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अरविंद जक्का, जनआंदोलन समितीचे इब्राहिम खान आदी संबंधित करणार आहेत.