निरगुडसर : येथील बेटवस्ती, थोरातमळा, हांडेवस्ती बूथ क्रमांक ११-७ मधील पंचायत समिती गण क्र. २१ तसेच निरगुडसर बेलसरवाडी येथील पंचायत समिती गणाच्या मतदान मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले़सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर दुपारपर्यंत मतदान सुरळीत सुरू होते. मात्र दुपारनंतर मशिनमध्ये तांत्रिक बिघाडाला सुरुवात झाली़ त्यानंतर ३.३० च्या सुमारास मशिन पूर्णपणे बंद पडले़ जिल्हा परिषदेचे मतदान मशिन सुरू होते़ परंतु पुन्हा तीच मतदान प्रक्रिया करावी लागणार असल्याने अधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रिया दुसरे मशिन येईपर्यंत बंद ठेवले़ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक २०१७ आंबेगावचे निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश भालेदार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र सबनीस यांनी तत्काळ दुसरे नवीन मशिन आणून जोडले. परंतु यामध्ये सुमारे एक तास निघून गेला. त्यामुळे बूथवरील गर्दी वाढत गेली आणि नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले़़ बूथचे निवडणूक अधिकारी यांनी रांगेत उभे असलेल्यांना टोकन देऊन मतदान होईपर्यंत मतदान केंद्र सुरू ठेवून मतदान करून घेतले़दरम्यान, मतदार याद्यांमधील झालेल्या सावळा गोंधळामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले़ गेल्या ३० ते ४० वर्षांपासून मतदान करीत असलेल्या अनेकांची नावे मतदार यादीतून वगळली गेल्याने अनेकांना मतदान केंद्रावरून माघारी जावे लागले. निरगुडसर, मेंगडेवाडी, बेलसरवाडी मतदान केंद्रावर अनेकांना मतदार यादीत नाव नसल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला़
निरगुडसरला मतदान यंत्रामध्ये बिघाड
By admin | Published: February 22, 2017 2:29 AM