पुणे : शहराच्या मध्यवस्तीतील वैकुंठ स्मशानभूमीमुळे परिसरात वायू प्रदूषण होत असून, नागरिकांना धुराचा त्रास होत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठविला होता. त्याचा परिणाम झाला असून या भागातील हवेच्या गुणवत्तेची ‘नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट’ (निरी) या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थेमार्फत तपासणी केली जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
पालिकेच्या सर्व यंत्रणांची निरीच्या माध्यमातून त्रयस्थ तपासणी होणार आहे. येत्या सहा महिन्यांत महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या माध्यमातून सद्य:स्थिती समजावून घेणे, जागा पाहणी करणे, स्मशानभूमीतून बाहेर पडणारा धूर आणि हवेची गुणवत्ता तपासणे, त्याद्वारे सध्याच्या यंत्रणेचे विश्लेषण करणे आणि आवश्यक तांत्रिक सुधारणा करणे असे कामाचे स्वरूप राहणार आहे.
चौकट
धुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी या परिसरातील रहिवाशांनी पालिकेकडे लेखी आणि पीएमसी पोर्टलवर ऑनलाइन केल्या आहेत. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणातही दावा दाखल केला असून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आहे.
चौकट
वैकुंठामध्ये तीन विद्युतदाहिन्या, एक गॅसदाहिनी आणि लाकडाच्या सरणावर अंत्यसंस्कारासाठी चार शेड कार्यन्वित आहेत. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आठ स्वतंत्र ‘स्क्रबर’ आणि ‘ब्लोअर’ यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.