पुणे : पुणे महापालिकेतर्फे दर वर्षी देण्यात येणारा सन-२०२०चा ‘बालगंधर्व पुरस्कार नाट्य आणि संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेत्री निर्मला गोगटे यांना, तर सन २०२१ चा पुरस्कार शास्त्रीय संगीत गायन क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या गायिका डॉ. रेवा नातू यांना जाहीर झाला आहे.
सदर पुरस्कारासाठी निवड समितीची बैठक बुधवारी महापौर कार्यालयात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह पालिकेतील अन्य पदाधिकारी व माजी आमदार उल्हास पवार, माजी आमदार, अनुराधा राजहंस, डॉ. सतीश देसाई आदी निवड समिती सदस्य उपस्थित होते.
कोरोना आपत्तीमुळे बालगंधर्व पुरस्काराचे वितरण होऊ शकले नव्हते. २६ जून रोजी बालगंधर्वांची जयंती साजरी करण्यात असून, त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून सन २०२० व सन २०२१ च्या बालगंधर्व पुरस्कारांची घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली.
सन २०२० च्या या मुख्य पुरस्काराबरोबरच चित्रपट व नाट्य क्षेत्रातील लेखन व दिग्दर्शनासाठी किरण यज्ञोपवित, नाट्य व्यवस्थापनासाठी प्रवीण बर्वे, रंगमंच व्यवस्थापनासाठी बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून संदीप देशमुख, संगीत रंगभूमीवरील योगदानासाठी ज्येष्ठ कलाकार रवींद्र कुलकर्णी आणि बालगंधर्वांचा ठेवा जतन करुन, विविध नाट्यसंमेलनात प्रदर्शन भरवून, त्यांची आठवण नवीन पिढीला करून देण्यासाठी अनुराधा राजहंस यांची इतर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.
सन २०२१ च्या मुख्यचा बालगंधर्व मुख्य पुरस्काराबरोबरच व्हायोलिन क्षेत्रातील शिक्षिका व कलाकार रमा चोभे, नाट्य क्षेत्रातील व्यवस्थापनासाठी समीर हंपी, बहुआयामी नाट्यकर्मी प्रसाद वनारसे, बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून गणेश माळवदकर, लेखन, दिग्दर्शन, प्रकाश योजनाकार तसेच बॉक्स थिएटरच्या निर्मितीसाठी प्रवीण वैद्य यांची इतर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.
१५ जुलै रोजी बालगंधर्व यांची पुण्यतिथी असते. त्यादिवशी पुढील काळात कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन, बालगंधर्व पुरस्काराचा वितरण सोहळा गुरुवार, दि. १५ जुलै २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. सदर पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व पुष्पहार असे आहे.