बारामती : भारत देश जगातील सर्वाधिक मोेठा साखर उत्पादक देश बनला आहे. साखर निर्यातीत देखील आपला देश जगात आघाडीवर आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी निर्णय घेतल्याने साखर उद्योगाला चांगले दिवस आले, हे बारामतीत सांगताना मला आनंद होत आहे. मोदी सरकारने या क्षेत्रात राजकारण केले नाही, तर सहकाराला मंदिर मानून मोदी सरकार काम करीत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
बारामती येथे आयोजित सहकार परीषदेत निर्मला सीतारामण बोलत होत्या. यावेळी सीतारामन पुढे म्हणाल्या, देशाच्या विकासात गेल्या शतकापासून सहकाराचे मोठे योगदान आहे. मोदी सरकारने देश पातळीवर सहकारासाठी स्वतंत्र मंत्रालय बनविले, त्यामुळे सहकारातील प्रत्येक समस्या मार्गी लागण्यास मदत झाली. मोदी सरकारने सहकार क्षेत्रासाठी हे मोठे पाऊल विचार करून टाकल्याचे त्या म्हणाल्या.
सहकारात सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे. मात्र, सहकाराचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग झाल्याने सर्वसामान्य माणूस अधिक अडचणीत आला. सहकाराचा वापर स्व:कल्याणसाठी करणाऱ्यांनी सहकाराकडे दुर्लक्ष केले, त्याचा फटका या क्षेत्रातील सर्वसामान्यांना बसला. देशातील शेती क्षेत्रात पतपुरवठा करणाऱ्या ६३ हजार सोसायट्यांच्या पारदर्शी कारभारासाठी केंद्र सरकारने २ हजार ५१६ कोटींची तरतुद केल्याचे त्या म्हणाल्या.