पुणे : नागरिकांनी अापल्या घरातील निर्माल्य नदीच फेकू नये, जेणेकरुन नदी प्रदूषित हाेणार नाही हा हेतूने पुणे महानगरपालिकेकडून विविध ठिकाणी अाणि पुलांवर निर्माल्य कलश ठेवण्यात अाले हाेते. याचा माेठ्याप्रमाणावर वापर नागरिक करत हाेते. परंतु सध्या शहरातील अनेक ठिकाणांवरील हे निर्माल्य कलश गायब झाले अाहेत. त्यामुळे नागरिक अापल्या घरातील निर्माल्य हे पुलांवरच टाकत असल्याने पादचाऱ्यांना त्याचा अडथळा हाेत अाहे. पुन्हा निर्माल्य कलश ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत अाहे.
स्वच्छ पुणे सुंदर पुणे असे बिरुद पुणे महानगरपालिका लावते. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेकडून उपाययाेजना करण्यात येतात. त्यातच नागरिकांकडून नदीत निर्माल्य टाकले जात असल्याने नदी प्रदूषित हाेत हाेती. म्हणून पालिकेकडून विविध ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात अाले. नागरिक पुलांवरुनच नदीत हे निर्माल्य टाकत असल्याने खासकरुन विविध पुलांवर हे निर्माल्य कलश ठेवण्यात अाले. त्यानंतर नागरिकांनी या कलशामध्ये निर्माल्य टाकण्यास सुरुवात केली. परंतु अाता हे निर्माल्य कलश काढून टाकण्यात अाल्याने नागरिक निर्माल्य पुलावरील पदपथांवर ठेवत असल्याचे चित्र अाहे. यामुळे येथून जाणाऱ्या पादचाऱ्यांना चालताना अडचण निर्माण हाेत अाहे.
दरम्यान राज्य सरकारने प्लाॅस्टिक बंदी केली असली तरी या ठिकाणी ठेवण्यात अालेले निर्माल्य व इतर कचरा हा प्लाॅस्टिकच्या पिशवीत ठेवण्यात अाला अाहे. त्यामुळे प्लाॅस्टिक बंदी झाली असली तरी नागरिकांकडे प्लाॅस्टिकच्या पिशव्या असल्याचे दिसून येत अाहे.