Nisarga Cyclone: दोन वर्षांच्या प्रतिक्षेतनंतर नुकसान भरपाई मिळणार; तब्बल ८ कोटींचा निधी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 06:01 PM2021-11-19T18:01:50+5:302021-11-19T18:01:59+5:30
निसर्ग चक्रीवादळात जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, हवेली सह अन्य तालुक्यांना मोठा फटका बसला. यामध्ये हजारो शेतकरी व लोकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले.
पुणे : जिल्ह्यात जून २०२० मध्ये महिन्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळात जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, हवेली सह अन्य तालुक्यांना मोठा फटका बसला. यामध्ये हजारो शेतकरी व लोकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. या लोकांना शासनाकडून मदत करण्यात आली खरी पण ही मदत अर्धवट झाली. खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेकडो शेतकरी मदतीपासून वंचित होते. यासाठी संबंधित आमदार, ग्रामपंचायत सदस्यांनी प्रचंड पाठपुरावा केल्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यासाठी ८ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर केला. जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी देखील तातडीने हा निधी संबंधित तालुक्यांना एकाच दिवसात वाटप देखील केला.
जिल्ह्यात जून महिन्या आलेल्या चक्रीवादळात जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, हवेलीसह अन्य तालुक्यांना मोठा फटका बसला. यामध्ये तब्बल दीड हजार पेक्षा अधिक घरे, गुरांचे गोठे, पाॅलीहाऊस, कांद्याच्या बराखी, नेटशेडचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे या सर्व बाधित लोकांना नुकसान भरपाई देण्यास शासनाकडून उशीर झाला. विरोधी पक्षाने टिका केल्यानंतर तीन - चार महिन्यानंतर हा निधी उपलब्ध करून देण्यात आला. पुणे जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात ७७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. पुणे जिल्ह्यातील शंभर टक्के बाधित लोकांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी आणखी १० कोटी रुपयांची मागणी केली आहे. गेल्या एक -दीड वर्षांपासून जिल्ह्यातील हजारो बाधित लोक मदतीपासून वंचित होते. यासाठी अजित पवार यांना लेखी निवेदने देण्यात आली. अखेर शासनाने दोन वर्षांनंतर हा निधी उपलब्ध करून दिला.
एका दिवसांत तालुक्यांना निधीचे वितरण
''जिल्ह्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळात मोठ्याप्रमाणात शेतक-यांचे नुकसान झाले. यामध्ये लोकांच्या घरांचे, गुरांचे गोठे, कांदा शेड, पोल्ट्री फार्म चे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाने पहिल्या टप्प्यात ७७ कोटींचा निधी दिला. परंतु त्यानंतर जुन्नर, खेड आणि आंबेगाव तालुक्यातील लोक मदतीपासून वंचित होते. यासाठी शासनाकडे दहा कोटींची मागणी करण्यात आली होती. अखेर शासनाने ८ कोटी ४० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार एकाच दिवसांत संबंधित तालुक्यांना निधीचे वाटप करण्यात आले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांनी सांगितले.''