पुणे: ‘नितळ’ या चित्रपटामध्ये ‘ल्युकोडर्मा’मुळे त्वचेवर पांढरे डाग असलेल्या एका डॉक्टरची भूमिका साकारली होती. सुरुवातीला चेहऱ्यावर पांढ-या डागांचा मेकअप केल्यावर माझा उत्साह मावळला होता; परंतु ती भूमिका समजून घेताना सौंदर्याकडे पाहण्याची माझी दृष्टी बदलली. तू पांढरे डाग असलेल्या मेकअपमध्ये अगदी छान दिसतेस. कधीतरी याच मेकअपमध्ये बाहेर जात जा, असे ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर म्हणाले होते अशी आठवण प्रसिद्ध अभिनेत्री देविका दफ्तरदार यांनी कथन केली.अभिनेता किंवा अभिनेत्री ही छान दिसायला हवी अशी सर्वांप्रमाणेच माझीही सुरुवातीला धारणा होती; मात्र खरे सौंदर्य आपल्या व्यक्तिमत्त्वाचे, निर्मळ मनाचे असते ही गोष्ट मनावर ठसली. चित्रपटांमध्ये दृष्टिकोन बदलण्याची ताकद असते, असेही ती म्हणाली.पी. एम. शहा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय आरोग्य चित्रपट महोत्सवाचा समारोप देविका यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे झाला. या वेळी त्या बोलत होत्या. या महोत्सवासाठी आरोग्यविषयक ३८ लघुचित्रपट व माहितीपट निवडले गेले होते. यातून आकांक्षा चित्कारा दिग्दर्शित ‘अ बीस्ट कॉल्ड ब्यूटी’ या माहितीपटाला आणि उमेश बगाडे दिग्दर्शित ‘अनाहूत’ या लघुपटाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करून गौरवण्यात आले. पी. एम. शहा फाउंडेशनचे संचालक अॅड. चेतन गांधी या वेळी उपस्थित होते.अनेक आजारांबद्दल अजूनही फारसे बोलले जात नाही. अशा विषयांवरील माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपट हे चांगले माध्यम असल्याचे देविका दफ्तरदार यांनी सांगितले. चित्रपट अभ्यासक डॉ. चंद्रशेखर जोशी, अनुजा देवधर व वैद्यकीय व्यावसायिक डॉ. लीना बोरुडे यांनी या महोत्सवासाठी परीक्षक म्हणून काम पाहिले.‘आय होल्ड ब्लड’ या माहितीपटाला मिळाला प्रथम क्रमांकरिद्धी छाब्रा दिग्दर्शित ‘आय होल्ड ब्लड’ व रिनीता बॅनर्जी दिग्दर्शित ‘बियाँड वर्ड्स’ या माहितीपटांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय, तसेच सुमीत पाटील दिग्दर्शित ‘तरंग’ व पुष्पनाथन अरुमुगम दिग्दर्शित ‘कावल दैवम’ या लघुपटांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले.
‘नितळ’मुळे सौंदर्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली - देविका दफ्तरदार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 2:00 AM