पुणे: शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा, आणखी एकाची विकेट जाणार आहे. त्यांचे नाव आताच जाहीर करणे योग्य नाही, असा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. या विधानावर आमदार नितेश राणेंनी टोला लगावला आहे. हे काय महाविकास आघाडीचे सरकार आहे काय? मंत्री सक्षम आहेत. मोठे मताधिक्य आहे. ताईंनी वाट पाहत बसावे ,दिवस मोजावे ,आकाशाकडे पाहत बसावे असा टोला राणे यांनी लगावला. शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने तिथीप्रमाणे साजरा करण्यात येणाऱ्या शिवजयंती महोत्सवात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राणे म्हणाले. महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर नको ही हिंदू समाजाची भावना आहे. ती आठवण आम्हाला नको. महाराष्ट्रात प्रत्येक जण अस्वस्थ आहे. औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हाल करून त्यांना संपविले. त्याची कबर आपल्याकडे कशाला? काही लोकांना ती आठवण म्हणून वाटते ,पण आम्हाला हिंदू समाज म्हणून ती नको आहे. आम्हाला अशी कुठलेही चिन्ह नको जे स्वराज्याच्या विरोधात उभे राहिले. कोणाला ती पाहिजे असल्यास त्यांनी पाकिस्तान बांगलादेशात घेऊन जावे. बजरंगदल, विश्वहिंदू परीषद यासंदर्भात राज्यभर आंदोलन करत आहेत. हिंदू समाजाची भावना आहे की औरंगजेबाची कबर नको. ही भावना प्रत्येकाला कळाली पाहिजे म्हणून राज्यभर आंदोलन होत आहेत याकडे शासनाचे बारीक लक्ष आहे.
फोन उचलल्यावर त्यांनी जय शिवराय म्हणू नये
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील व खासदार अमोल कोल्हे यांनी फोनवर बोलताना जय शिवराय बोलावे अशी मोहीम सुरू केली आहे यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, त्यांनी फोन उचलल्यावर अल्ला हू अकबर असे म्हणावे. जो पक्ष औरंगजेबाच्या विचारावर चालतो त्यांनी फोन उचलल्यावर जय शिवराय म्हणू नये. त्यांनी फोन उचलल्यावर अल्ला हु अकबर म्हणावे म्हणजे लोकांना कळेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा कार्यकर्ता बोलत आहे अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली आहे.