पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा खेळखंडोबा सुरु आहे. राजकीय नेत्यांकडून टीकाटिप्पणी बरोबरच वादग्रस्त वक्तव्येही केली जात आहेत. काही जणांकडून तर अक्षरशः जीभ घसरण्याइतपत वाईट वक्तव्ये केली जाऊ लागली आहेत. अशातच नितेश राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नितेश राणे यांनी हे बघा हिजड्यांचे सरदार असं वक्तव्य केलं होतं. उद्धव ठाकरे यांच्यावर राणेंनी केलेल्या टीकेनंतर पुण्यात तृतीयपंथी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्याबाबत तृतीयपंथींनी महाराष्ट्रात आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
पुण्यात मध्यरात्री बंडगार्ड पोलीस स्टेशनबाहेर तृतीयपंथी नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. मात्र पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यामुळे तृतीयपंथींनी मध्यरात्रीपासून आंदोलन सुरु केले आहे. सकाळी आंदोलन सुरु असताना पोलीस आणि तृतीयपंथी यांच्यात झटापट झाल्याचे दिसून आले आहे. यावेळी पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाला बळी पडत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.
दरम्यान नितेश राणेंनी वक्तव्याचे स्पष्टीकरण देत खुलासा केला आहे. तृतीयपंथी समाजाने माझं वाक्य व्यवस्थित ऐकले नसेल. मी जे बोललो ते आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्टेटमेंटचा आधार घेऊनच बोललो असल्याचे ते म्हणाले आहेत. मात्र तृतीयपंथींनी आंदोलन राज्यभर करण्याचा इशारा आता दिला आहे.