पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दुपारी चांदणी चौक येथील उड्डाणपूलाच्या कामाची आणि पुणे-सातारा महामार्गाची हवाई पाहणी केली. यावेळी गडकरींनी चांदणी चौकातील पूल पाडण्यासंदर्भातील कामाच्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. पुलाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्याचे काम ८ दिवसात पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
पुणे महानगर पालिका व पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीतून चांदणी चौक ते रावेत / किवळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील वाहतूक कोंडी सोडवण्याच्यादृष्टीने वडगाव उड्डाणपूल, मुठा नदीवरील पुल, वाकड जंक्शन, भूमकर चौक, रावेत चौक या भागातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी महामार्गाच्या आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आदेश भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांना गडकरींनी दिले.
शनिवारी मध्यरात्री दोन वाजता अवघ्या ५ सेकंदांत हा पूल जमीनदोस्त होणार
रविवारी रात्री दोन वाजता अवघ्या ५ सेकंदांत हा पूल जमीनदोस्त होणार आहे. त्यासाठी पुलावर १३०० छिद्र करून त्यामध्ये ६०० किलो नायट्रेट स्फोटकांचा वापर करण्यात येणार आहे. पूल जमीनदोस्त झाल्यावर राडारोडा, दगड कमी प्रमाणात खाली असलेल्या महामार्गावर पडावी, परिसरात धूळ कमी प्रमाणात पसरावी यासाठी जिओ नामक विशिष्ट पांढऱ्या रंगाचे कापड पुलावर अंथरण्यात आले असून, लोखंडी जाळ्यादेखील लावण्यात आल्या आहेत.