पुणे: पुण्यात मेट्रोचे जाळे वाढवले तर शहरातील वाहतूककोंडी कमी होईल. तसेच पुण्यातील हवा, जल आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी कार्यक्रम आखला पाहिजे. भारतातल्या सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये पुणे अग्रेसर आहे. यामुळे सर्वांनी प्रदुषण कसं कमी करता येईल यावर लक्ष दिलं पाहिजे, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी पुण्यात उड्डापुलाच्या भूमिपूजनाप्रसंगी मांडले.
प्रदुषण कमी करण्यासाठी पोलीस आणि अँब्यूलन्स सोडून मी सर्वांचे लाल दिवे काढून टाकले. सगळ्या मंत्र्यांच्या गाड्यांचे सायरन बंद केले आहेत. मंत्र्यांसाठी सायरन आणि सलामी हा मोठा आकर्षणाचा विषय आहे, असा टोलाही गडकरींनी लगावला.
प्रशासनाच्या मागे तुतारी घेऊन धावले तरच कामं होतात- नितीन गडकरी
भुसंपादन करून दिलं तर पुण्यात रिंग रोड बांधून देईन, ही मोठी घोषणाही याप्रसंगी गडकरींनी केली. पुणे-बंगळुरू 40 हजार कोटींचा नवा महामार्ग बांधण्याची योजना आहे. तसेच पुणे-बंगळुरू नव्या महामार्गाच्या शेजारी नवं शहर वसवायचं आणि मेट्रोने जोडता येईल अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात 221 किलोमीटर लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा नारळ गडकरींच्या हस्ते आज शुक्रवारी (दि. 24) फोडला गेला. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल 134 कोटीं रुपयांची रस्ते, पुलांची कामे करण्यात येणार आहेत.