पुणे - लोकशाही दोन चाकांवर चालते. एक सत्ताधारी पक्ष आणि दुसरा विरोधी पक्ष आणि शक्तीशाली विरोधपक्ष ही लोकशाहीची आवश्यकता आहे. यामुळे काँग्रेस पक्ष मजबुत व्हावा, असे मला मनापासून वाटते, गडकरी म्हणाले, जर देशात काँग्रेस कमी होत आहे, तर त्याची जागा स्थानिक पक्ष घेत आहेत आणि हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळेच लोकशाहीत विरोधीपक्ष मजबूत असायला हवा, असे मला मनापासून वाटते, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते पुण्यात 'लोकमत' आयोजित 'पत्रकार पुरस्कार २०२२' कार्यक्रमावेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीत बोलत होते.
लोकशाही संदर्भात आपल्याला काय वाटते? मी असे मानतो की आपला लोकशाहीवर अत्यंत विश्वस आहे. विरोधीपक्ष असायला हवा आणि विरोधीपक्ष असेल तरच लोकशाही जिवंत राहील, असं आपण मानता, तर या दृष्टीने आपण काय करत आहात? असा प्रश्न लोकमतच्या एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी गडकरी यांना विचारला असता ते बोलत होते.
गडकरी म्हणाले, लोकसभेत पंडित जवाहरलाल नेहरू या गोष्टीचे एक उदाहरण आहेत की, अटलजी निवडणूक हरल्यानंतरही पंडितजींनी त्यांचा सन्मान केला होता. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, की जे काँग्रेसचे आहेत. त्यांनी काँग्रेसवर श्रद्धा ठेऊन काँग्रेसमध्येच रहायला हवे.
जेव्हा मी भाजपचे काम करायला सुरुवात केली तेव्हा मी पुण्यात आलो होतो. हा माझ्या जीवनातला एक फार चांगला प्रसंग आहे. तेव्हा लक्ष्मणराव मानकर आणि मी महाराष्ट्र एक्सप्रेसने सकाळी पुणे स्टेशनवर उतरलो. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर गाडी आली. मी भाजपचं साहित्य खांद्यावर घेऊन चालायला लागलो. तेव्हा तसेच काम करत होते. तेवढ्यात डॉक्टर श्रीकांत जिचकर माझ्या मागून आले. ते फस्टक्लासच्या डब्यातून येत होते. त्यांनी मला पाहिलं आणि म्हणाले, हे सामाना याला देऊन टाक, तू का घेतोय, तेव्हा मी म्हणालो हे माझ्या पक्षाचं आहे. कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आलोय, यावर ते म्हणाले, नितीन तू फार चांगला आहेस, पण तुला या पक्षाचे काही भविष्य नाही. तू पक्ष सोड, काँग्रेस पक्षात जा, चांगल्या पक्षात जा, तुझं करीअर चांगलं होईल. मी म्हणालो, श्रीकांत, मी विहिरीत उडी मारून जीव देईन पण, माझे विचार आणि पक्ष सोडणार नाही.
१९७८-८० ची गोष्ट आहे, पुणे स्टेशनच्या बाहेर काळ्या भिंतीवर लिहिलेले होते, फर्रे फर्रे ओरडतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले दोन आणि बाजूला लिहिले होते, हम दो हमारे दो... ते बघून मी हसतही होतो आणि मला दुःखही होत हतं की, मी ज्या पक्षाच्या पहिल्याच बोठकीला जात आहे, त्याचे भविष्य काय असेल. तर क्षणभर मला वाटले की पक्षाचे भविष्य काय असेल, पण अनेक कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घेतली आणि दोन असलेल्या पक्षाचे नेते अटलजी पंतप्रधान बनले. यामुळे संधी मिळेल. निराश होऊन पक्ष सोडने योग्य नाही. जी विचारधारा आहे ती कायम ठेवून काम करायला हवे. आपण परिश्रम करत राहिलात तर एक वेळ पराभवही होतो आणि एकवेळ विजयही होतो हे निश्चित. असेही गडकरी यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी, नितीन गडकरी यांच्या हस्ते 'लोकमत' आयोजित 'पत्रकार पुरस्कार २०२२' कार्यक्रमात पत्रकारांचा सन्मानही करण्यात आला.