पुणे : व्यावसायिकाकडून जमीन बळकावण्यासाठी त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन मारहाण केल्या प्रकरणातील आरोपी नितीन मनोहर हमने याला ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी जामीन मंजूर केला आहे.
बचाव पक्षातर्फे न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. आरोपीने दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी. आरोपीने साक्षीदारांवर दबाव आणता कामा नये किंवा तक्रारदाराला भेटता कामा नये, तसेच मंजूर केलेल्या जामीन अर्जाचा गैरफायदा घेता कामा नये आणि अशा स्वरूपाचा कोणताही गुन्हा परत करता कामा नये या अटींवर न्यायालयाने हमने याला जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या बाजूने अॅड. सचिन झालटे, अॅड. अभिषेक जगताप, अॅड. माधवी पवार यांनी काम पाहिले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी अॅड. दीप्ती काळे हिचा ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. तर नीलेश शेलार (रा. कोथरूड) आणि आणखी दोन आरोपींविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.