पुणे : स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिकेने स्थापन केलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (पीसीडीसी) या स्वतंत्र कंपनीच्या अध्यक्षपदाची सूत्रे मंगळवारच्या (दि. ३१) बैठकीत पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडून राज्याचे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर स्वीकारतील. पीसीडीसीच्या अध्यक्षपदी आयुक्त कुणाल कुमार होते. या पदावर महापौरच असावेत, अशी शिफारस सर्वसाधारण सभेने केली होती; मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून आयुक्तांनाच अध्यक्ष केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली कंपनीच्या दोन बैठकाही झाल्या. त्यानंतर सरकारने अचानक एका आदेशाद्वारे आयुक्तांना या पदावरून हटवून करीर यांच्याकडे हे पद दिले. त्याची अंमलबजावणी आता मंगळवारच्या बैठकीत होईल. नगररचना सहसंचालक प्रकाश भुक्ते हे पीसीडीचे संचालक आहेत. त्यांच्या जागेवर करीर यांना संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे; त्यामुळे मंगळवारच्या बैठकीत प्रथम भुक्ते यांचा राजीनामा घेतला जाईल व त्या जागेवर करीर यांची नियुक्ती होईल. त्यानंतर आयुक्त कुणाल कुमार अध्यक्षपदाची सूत्रे करीर यांच्याकडे देतील. करीर यांच्या उपस्थितीत लगेचच कंपनीची बैठकही होईल. त्यात पीसीडीसीच्या विविध प्रकल्पांवर चर्चा होईल. त्यातील सिग्नल्सचे अत्याधुनिकरण, स्मार्ट मोबॅलिटी कार्ड असे काही लहान प्रकल्प निविदा जाहीर करण्याच्या टप्प्यावर असून, त्यावर बैठकीत काही निर्णय होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
नितीन करीर आज स्वीकारणार सूत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2016 2:22 AM