लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची महापालिकेकडून खरेदी करण्यात येणार असून, मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रथम २५ हजार इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली़
शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व रुग्णांवरील उपचारासाठी गरज असलेले रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता, प्रारंभी महापालिकेने दोन कंपन्यांकडून २५ एप्रिलपर्यंत ७ हजार इंजेक्शन मागविले आहेत़ ते उपलब्ध होताच, रुग्णांच्या प्रकृतीची प्राथमिकता लक्षात घेता ते त्यांना वितरित करण्यात येणार आहेत़ सध्या शहरात सुमारे ९ हजार रूग्ण हे आॅक्सिजन बेडवर उपचार घेत असून, यापैकी ५० टक्के रूग्णांना इंजेक्शनची मागणी होत आहे़
दरम्यान आजच्या बैठकीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही उपचार घेणाऱ्या रुग्णांना ३१ मेपर्यंत आवश्यकता भासल्यास सदर रेमडेसिविर इंजेक्शन पूर्णत: मोफत देण्याबाबतचाही निर्णय घेण्यात आला आहे़ महापालिकेला इंजेक्शन लवकरात लवकर प्राप्त व्हावेत याकरिता महापालिका आयुक्तामार्फत पुण्याचे जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येत असल्याचेही रासने यांनी सांगितले़
--------------------