पुणे : आर्थिक व बांधकाम क्षेत्रातील मंदीचा मोठा फटका यंदा महापालिकेला बसला आहे. चालू आर्थिक वर्षात बांधकाम परवाना शुल्कातून महापालिकेला केवळ ५६१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सन २०१७-१८ वर्षासाठी बांधकाम परवान्यामधून तब्बल १ हजार ४०० कोटींचे उत्पन्न मिळेल, असे गृहीत धरण्यात आले होते.गेल्या एक-दोन वर्षांपासून महापालिकेला बांधकाम परवाना शुल्कातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये घट सुरूच आहे. महापालिकेच्या उत्पन्नामध्ये राज्य शासनाकडून स्थानिक संस्थाच्या कराच्या बदल्यात जीएसटीचे मिळणारे अनुदान, मिळकतकर आणि बांधकाम परवाना शुल्क अशा प्रमुख उत्पन्नाचा समावेश आहे. त्यात चालू वर्षात जीएसटी अनुदान आणि मिळकतकर अशी अपेक्षित उत्पन्नापर्यंत पालिकेने मजल मारली आहे. मात्र, बांधकाम क्षेत्रात असलेल्या मंदीमुळे बांधकाम परवाना शुल्कात मात्र मोठा फटका बसला असल्याचे समोर आले, महापालिका प्रशासनाने चालू वर्षात बांधकाम परवान्यामधून १ हजार ४०० कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले असतानाच प्रत्यक्षात मात्र केवळ ५६१ कोटी४६ लाख इतके उत्पन्न २८ मार्च अखेरपर्यंत जमा झाले आहे. त्यामुळे जवळपास ८३८ कोटी ५४ लाखांचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे गत दोन वर्षात मिळालेल्या उत्पन्नाप्रमाणेच यावर्षीच्या उत्पन्नाचा आलेख राहिला आहे. २०१६-१७ या वर्षात ५३२ कोटी ९७ लाख तर २०१५-१६ या वर्षात ७४७ कोटी ३० लाखांचे उत्पन्न बांधकाम परवाना शुल्कातून मिळाले होते.
बांधकाम क्षेत्रातील मंदीचा महापालिकेला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 3:35 AM