पुणे : अर्थसंकल्पात कोटींच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या पुणे महापालिकेला आर्थिक घडी सुरळीत ठेवण्यासाठी पुन्हा एकदा कर्जांसाठी बँकांची दारे ठोठवावी लागणार आहेत. यापूर्वी चोवीस तास पाणी पुरवठा योजनेसाठी २०० कोटी रुपयांचे ‘कर्जरोखे’ घेणाऱ्या पालिकेने यावर्षी पुन्हा एकदा २०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी पावले उचलली आहेत.
महापालिका आयुक्तांनी चोवीस तास पाणी पुरवठा योजनेसाठी २०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी विविध बँकांकडून प्रस्ताव मागविले आहेत. बँकांकडून प्रस्ताव आल्यानंतर येत्या आठवडाभरात कर्ज काढण्याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.
पुणे महापालिकेने २०१६ मध्ये समान पाणी पुरवठा योजनेचे काम हाती घेतले. दोन हजार कोटी रूपयांची ही योजना २०२३ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. सध्या पाणी पुरवठ्याकरिता दोन ते तीन झोन मध्ये नवीन पाईपलाईन आणि मीटर बसवण्याचे काम झाले आहे. कोरोना आणि काही ठिकाणी राजकीय कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या हस्तक्षेपामुळे सध्यातरी या योजनेचे काम धीम्या गतीने सुरू आहे.
या योजनेसाठी महापालिका आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्ष यांनी अर्थसंकल्पात जमेच्या बाजूला कर्जाची रक्कम अपेक्षित धरली असून, त्यानुसारच हे कर्ज घेण्यात येत आहे. महापालिकेला फेब्रुवारी अखेरपर्यंत ३ हजार ७०० कोटी रुपये उत्पन्न मिळाले. मार्च महिन्यात मिळणारे जीएसटी, बांधकाम परवानगी आणि शासकीय देणी, तसेच २०० कोटी रुपयांचे कर्ज हे गृहीत धरुन महापालिकेचे उत्पन्न सुमारे ४ हजार ४०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.
--------------------------