पुणे : महानगरपालिकेची आचारसंहिता लागू झाली असली, तरी अनेक नामफलक, राजकीय पक्षांचे फलक तसेच आहेत. त्याचबरोबर वाहनांवर फ्लेक्ससारखे मोठमोठे स्टिकर लावले असून त्यावर कारवाई कधी होणार हा प्रश्न आहे. पुणे महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याअगोदरपासूनच प्रशासनाच्या वतीने बॅनर, फ्लेक्सवर कारवाई सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे ३६ हजारांहून अधिक फ्लेक्सवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, गुरुवारी शहरात पाहणी केली असता अनेक ठिकाणी फ्लेक्स आणि बॅनर असल्याचे दिसून आले. वाहनांवर नेत्यांच्या आणि उमेदवारांच्या छायाचित्रांसह मोठमोठे फ्लेक्स लावण्याची नवीन पद्धत सध्या सुरू आहे. गाडीची मागची संपूर्ण काच भरून फ्लेक्स लावण्यात आलेले असतात. अगदी महापालिकेच्या आवारातही अशी वाहने दिसत आहेत. मात्र, त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीची कारवाई झाल्याचे दिसत नाही. इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांनी मोटारींवरील काचेवर स्टिकर चिकटविले आहेत. (प्रतिनिधी)
वाहनांवरील फ्लेक्सवर नाही कारवाई
By admin | Published: January 13, 2017 3:46 AM