पुणे : सरसकट सर्वच रिक्षाचालकांवर कारवाई न करण्याचे आश्वासन प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी रिक्षा पंचायतला दिले. मुक्त परवाना धोरण बंद करण्याबाबत येत्या आठ दिवसांत सरकारला कळवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
महिला अत्याचाराच्या काही घटनांमध्ये रिक्षाचालकांचा सहभाग आढळल्याने आरटीओ, पोलीस यांनी शहरातील सर्वच रिक्षाचालकांवर कारवाई सुरू केली होती. त्याच्या निषेधार्थ रिक्षा पंचायतीने बुधवारी (दि. २२) आरटीओ कार्यालयासमोर निदर्शने केली. सोपान घोगरे, प्रकाश वाघमारे, सिद्धार्थ चव्हाण, मनोज पिल्ले, मुन्ना शेख, प्रशांत कांबळे आदी पदाधिकारी तसेच रिक्षाचालक आंदोलनात सहभागी झाले होते.
त्यानंतर पंचायतीसोबत चर्चा करताना शिंदे यांनी कागदपत्र नसणाऱ्या, नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाईल. याआधीच्या कारवाईत सर्व कागदपत्रे व्यवस्थित आढळली तर कारवाई मागे घेतली जाईल, असे स्पष्ट केले. “मुक्त परवाना धोरणामुळे या व्यवसायात गुन्हेगारी मनोवृत्तीचे समाजकंटक शिरले आहेत”, असे नितीन पवार यांनी सांगितले. सर्वसामान्य रिक्षाचालक कोणत्याही गुन्ह्यात कधीही साथ देणार नाही, त्यामुळे सरकारने हे मुक्त परवाना धोरण त्वरित बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली.