पुणे: अनेक संस्थाचालक माेठ्या उत्साहात इंग्रजी तसेच मराठी माध्यमाच्या शाळा सुरू करतात. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश न झालेल्या पुणे जिल्ह्यातील १६ शाळांची यादी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. या शाळांची नावे यु-डायस पाेर्टलवरून हटविण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बंद हाेणाऱ्या शाळांमध्ये नामांकित इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांसह दाैंड येथील समाजकल्याण विभागाचे एस. सी. ॲण्ड नवबाैध्द बाॅइज रेसिडेन्शियल स्कूल आणि औंध येथील खासगी अनुदानित गाेरा कुंभार हायस्कूल या शाळांचा समावेश आहे. दाैंड, हवेली, मुळशी, शिरूर, वेल्हे या तालुक्यांसह औंध, बिबवेवाडी, हडपसर, पिंपरी, आकुर्डी येथील शून्य पटाच्या १६ शाळा आहेत. यातील बहुतांश शाळा या स्वयंअर्थसहाय्य (सेल्फ फायनान्स) आणि खासगी विनाअनुदानित आहेत. यातील अनेक शाळांमध्ये मागील वर्षी आणि यावर्षी एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे अशा शाळांची नावे यु-डायस पोर्टलवरून काढून टाकण्यात येणार आहेत.
यु-डायसवर शून्य पटाच्या शाळा असतील तर त्याचा राज्याच्या शैक्षणिक मूल्यांकनावर परिणाम होतो. दोन वर्षांपासून या शाळेत विद्यार्थी नसल्याने या शाळा बंद आहेत. त्यामुळे यु-डायस पोर्टलवरून या शाळा काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. - राजेंद्र अहिरे, शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग
पुणे जिल्ह्यातील शून्य पटाच्या शाळांची यादी
१) पी. जोग स्कूल, बिबवेवाडी२) गोरा कुंभार हायस्कूल, औंध३) कै. पी. बी. जोग हायस्कूल मराठी मीडियम, औंध४) हसन हुसैन इमामिया उर्दू हायस्कूल, हडपसर५) बाबुराव दामले माध्यमिक विद्यालय, मुळशी६) जी. जी. इंटरनॅशनल स्कूल, मुळशी७) डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, चऱ्होली, आकुर्डी८) संकपाळ इंटरनॅशनल स्कूल, हवेली९) राहुल इंटरनॅशनल स्कूल, मुळशी१०) पलांडे जुनिअर कॉलेज, शिरूर११) अमृतेश्वर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, वेल्हे१२) महात्मा फुले जुनिअर कॉलेज, औंध१३) गणेश इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी१३) दी काकस इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी१४) विश्व कल्याण इंग्लिश मीडियम, आकुर्डी१५) स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आकुर्डी१६) एस. सी. ॲण्ड नवबौद्ध बॉइज रेसिडेन्शियल स्कूल, दौंड