पुणे : पुण्यात लाखो नागरिक पीएमपीएमएलने प्रवास करतात. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने बसची संख्याही वाढवण्यात आली आहे. त्याबरोबरच शहरात ठिकठिकाणी बस स्टॉप आहेत. त्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी बस मार्ग आणि वेळापत्रक याची माहिती दिलेली असते. परंतु या बस स्टॉपवर मंजुरी न घेता कुठल्याही जाहिराती बेकायदेशीरपणे लावण्यात आल्याचे पीएमपीएमएलच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्टॉपचे विद्रुपीकरण होत असल्याने पीएमपीएमएलकडून मंजुरी न घेता कुठल्याही जाहिराती बस निवारा आणि बसेसवर लावण्यात येऊ नयेत, असे आवाहन त्यांनी फेसबुकवरून केले आहे.
तसेच पीएमपीच्या बसथांब्यांवर अनधिकृत जाहिराती लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय पीएमपी प्रशानसाने घेतला आहे.त्यामुळे त्यावर वाढदिवसाचे फलक, राजकीय जाहिराती आणि अन्य छोट्या जाहिराती अनधिकृतपणे लावू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
त्याचा प्रवाशांना होतोय त्रास
पीएमपीएमएलने प्रवाशांच्या सोयीसाठी बसविलेल्या बस निवाऱ्यांवर अनधिकृत जाहिराती बेकायदेशीरपणे लावण्यात आल्याने त्यांचे विद्रुपीकरण होत आहे. या अनधिकृत जाहिरातींमुळे प्रवाशांना त्यांच्या सोयीसाठी दिलेले बस मार्ग आणि वेळापत्रकाची माहिती वाचता येत नाही व त्याचा प्रवाशांना त्रास होत आहे. पीएमपीएमएलकडून मंजुरी न घेता कुठल्याही जाहिराती बस निवारा आणि बसेसवर लावण्यात येऊ नयेत, असे आवाहन पीएमपीएमएल करत आहे.