पुणे : तळजाई टेकडीसह सिंहगड रस्त्यावर झालेली वृक्षतोड आणि बांधकाम व्यावसायिकांकडून इमारती बांधताना होणारी झाडांची कत्तल यावरुन नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमध्ये चांगलेच धारेवर धरले. पालिकेच्या अधिकाऱ्यांना नगरसेवकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. शेवटी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी उत्तरे देऊन बोळवण केली. नगरसेवक सुभाष जगताप यांनी तळजाई टेकडीवर मोठ्या प्रमाणावर झाडे कापली गेली आहेत. वनविभागाच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रावरही ही वृक्षतोड झालेली आहे. वास्तविक त्यासाठी पालिकेची परवानगी घेणे आवश्यक होते. क्षेत्र जरी वनविभागाचे असले तरी पर्यावरण रक्षण ही पालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक होते असा मुद्दा उपस्थित केला. नगरसेविका नंदा लोणकर यांनी बांधकाम व्यावसायिकांकडून त्यांच्या साईट्सला चारही बाजूंनी मोठाले पत्रे लावून आतमध्ये असलेल्या झाडांची बिनबोभाट कत्तल होत असल्याकडे लक्ष वेधले. तर नगरसेवक अॅड. भैय्यासाहेब जाधव म्हणाले, झाडे तोडण्याची परवानगी दिल्यावर त्याबदल्यात दुसरीकडे लावल्या जाणाऱ्या वृक्षांची लागवड होते की नाही हे तपासण्याची यंत्रणा काय आहे अशी विचारणा केली. तसेच नगरसेवक अजित दरेकर यांनी सिंहगड रस्त्यावर झालेल्या वृक्षतोडीबद्दल किती गुन्हे दाखले अशी विचारणा केली.या प्रश्नांना आयुक्तांनी उत्तर दिले. आयुक्त म्हणाले, तळजाई टेकवडीवरील वनविभागाच्या जागेवरील क्लिरीसिडीया झाडे काढण्यात आली आहेत. त्यासाठी वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेतली आहे किंवा नाही याची माहिती घेतली जाईल. परंतू, राज्य शासनाने वन विभागाला अशी वृक्ष काढण्यासाठी प्राधिकृत केले आहे. नियमांचे उल्लंघन झालेले असल्यास कारवाई केली जाईल. तसेच बांधकाम व्यावसायिकांकडून बेकायदा वृक्ष तोड होत असल्यास त्याची तक्रार करावी, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, तसेच पयार्यी वृक्षारोपणाची माहिती घेतली जाईल. पयार्यी वृक्षरोपणासंदर्भात तज्ञ समुहाची मदत घेतली जाते. =====नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी उभे राहिलेल्या वृक्ष प्राधिकरणाचे वृक्ष अधिकारी तथा सदस्य सचिव गणेश सोनूने उभे राहिले. परंतू, त्यांना समाधानकारक उत्तरे देता नाहीत. अपुऱ्या माहितीच्या आधारे माहिती देताना सोनूने यांची तारांबळ उडाली. त्यामुळे शेवटी स्वत: महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी उभे राहात नगरसेवकांच्या प्रश्नांना मी उत्तरे देतो असे सांगून नगरसेवकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.
शहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 7:27 PM