पुणे : सध्याची राजकीय परिस्थिती चिंता निर्माण करणारी आहे. प्रत्येक विचारांचा एक काळ असतो. आपल्या देशाने क्रांतीचा इतिहास रचलेला आहे. याच विचाराने देशातील तरुणांनी चालले पाहिजे. 'स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील नेत्यांच्या कार्याचा तुलनात्मक विचार करता त्यांनी राष्ट्र उभारण्याचे काम केले. त्यांच्या कार्य, विचारांचा हाच वारसा घेऊन तरुणांनी काम केले पाहिजे. पण या वारशाला साजेसं काय काम करावे, याचं उत्तर आपल्या पिढीला दुर्दैवाने मिळाले नाही, अशी खंत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली. पं जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे मोतीराम पौळ संपादित 'राजकीय आत्मचरित्रे : स्वरूप आणि समीक्षा' व महावीर जोंधळे लिखित 'लौकिक' या पुस्तकांचे प्रकाशन सत्यजित तांबे यांच्या हस्ते झाले. यावेळी राजकीय विश्लेषक सदा डुंबरे, राजकीय अभ्याक प्रा. प्रकाश पवार, लेखक महावीर जोंधळे आणि संपादक मोतीराम पौळ उपस्थित होते.'महाराष्ट्राची नवी दिशा आणि आजची राजकीय भूमिका' या विषयावर बोलताना तांबे म्हणाले, 'नव्या पिढीला काम करण्याची दिशा व प्रेरणा मिळायला हवी आहे. पूर्वीच्या नेत्यांच्या विचारांची, काम करण्याची प्रेरणा या आत्मचरित्रांमधून मिळते. प्रा. प्रकाश पवार म्हणाले, 'देशात सध्या राजकीय गुंतागुंत निर्माण झाली आहे. हा गुंता समजून घेण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांना वेळ नाही. गेल्या शतकातील महाराष्ट्राची राजकीय व्यवस्था समजून घेण्यासाठी या पुस्तकांचा नक्कीच फायदा होईल. पूवीर्चे नेते प्रामाणिकपणे जनतेच्या हितासाठीच लढले. हा राजकीय नेतृत्वांचा इतिहास समजून घेतला तरच पुढची राजकीय पिढी सक्षम घडेल.' महावीर जोंधळे म्हणाले, 'लोकशाही समृध्द करण्यासाठी पूर्वीच्या नेत्यांनी केलेल्या ध्येयनिष्ठ कामाला, कष्टाला आपण विसरून चालणार नाही. खरंतर हा कोण्या एका पक्षाचा विचार नाही, समर्थन नाही. जे पाहिले, अनुभवले, ते तटस्थपणे मांडले आहे. श्रीरंजन आवटे यांनीही मनोगत व्यक्त केले. तर सूत्रसंचालन ऋतुजा फूलकर यांनी केले.
वारशाला साजेशा कामाचं उत्तर नव्या पिढीकडे नाही : सत्यजित तांबे यांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 4:45 PM
सध्याची राजकीय परिस्थिती चिंता निर्माण करणारी आहे..
ठळक मुद्दे'राजकीय आत्मचरित्रे : स्वरूप आणि समीक्षा' व 'लौकिक' पुस्तकांचे प्रकाशन