लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आंबेगाव येथील कचरा डेपो जळीतप्रकरणी पालिकेने शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिल्यानंतरही पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या प्रकरणी पालिका आणि पोलीस या दोन्ही यंत्रणांकडून टाळाटाळ केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमधूनही फारसे काही निष्पन्न होऊ शकले नसल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
आंबेगाव येथील कचरा प्रकल्पातून दुर्गंधी येत असल्याने, तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा होत असल्याचे कारण देत, या भागातील नागरिकांनी नोव्हेंबर महिन्यात आंदोलन केले होते. आंदोलनात हा प्रकल्पच पेटवून देण्यात आला. या प्रकल्पाला नागरिकांचा आणि लोकप्रतिनिधींचा विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे. आंदोलनाच्या दोन दिवस आधी या ठिकाणी ‘आंबेगावची फुरसुंगी होऊ दिली जाणार नाही,’ या आशयाचे फलक लावले गेले होते. त्यानंतर, या ठिकाणी आंदोलन झाले. या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला अज्ञातांनी आग लावली. ही आग दोन दिवस धुमसत राहिल्याने, धुरामुळे आरोग्याच्या तक्रारी निर्माण झाल्या.
या प्रकाराची गंभीर दखल घेत, पालिका आयुक्तांनी या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कारवाईचे आदेश दिले. प्रकल्पाच्या ठेकेदारामार्फत फिर्याद दाखल करण्यात आली. कचरा डेपो जाळण्याच्या प्रकाराचे सूत्रधार कोण याची माहिती घेतली जाऊ लागली, तसेच प्रकल्पाच्या ठिकाणच्या सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासण्याचे कामही सुरू करण्यात आले, परंतु आग लावण्यापूर्वी सीसीटीव्हीचा ‘डीव्हीआर’ फोडण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
प्रकल्पावर नेमणूक असलेल्या सुरक्षारक्षकांकडून पोलिसांनी आंदोलकांची ओळख परेड घेतली. मात्र, यामधूनही फारसे काही निष्पन्न होऊ शकले नाही. त्यामुळे पालिकेकडून आणखी एक गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले होते, परंतु पोलिसांनी अद्याप या पत्रावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.