लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “मी विवाह नोंदणी संकेतस्थळावर ‘जात’ हा शब्दच वापरलेला नव्हता. मला अनेकदा जात समाविष्ट करण्याबाबत विचारणा झाली. त्यामुळे मग पैसेच भरले नाहीत. मुलगी कुठल्या जातीची आहे किंवा जातीबाहेरची आहे याच्याशी मला काही देणेघेणे नाही. कारण मला जातीतला जोडीदार नकोस असे म्हटले तरी ‘जात’ हा शब्द आलाच. तेच मला नको आहे. मला फक्त लग्न करायचे आहे,” अशी भावना आता अनेक विवाहेच्छुक तरुण-तरुणी व्यक्त करताना दिसतात.
‘जाती’पेक्षा जोडीदाराचा स्वभाव, आवडीनिवडी जुळतात का हे महत्त्वाचे असल्याचे तरुणाईला वाटते. अपेक्षित वधू-वराच्या निवडीमध्ये लग्नाचे वय उलटून चालल्याने तरुणाईपुढच्या चिंता वाढू लागल्या आहेत. त्यामुळे जातीच्या फंदात न पडता कोणत्याही जातीतील अनुरूप जोडीदाराशी लग्न करण्याची तयारी दाखवणाऱ्यांची संख्या वाढते आहे.
मनोज गरबडे या तरुणाने सांगितले की, जातीपेक्षाही आयुष्यभराची साथ मिळेल का हे पाहणे मला महत्त्वाचे वाटते. मनोजसारखेच असंख्य तरुण-तरुणी ‘अरेंज मॅरेज’मध्ये जातीबाहेर लग्न करण्याचा विचार करीत आहेत. अनेक तरुण-तरुणींनी जातीबाहेरचा जोडीदार निवडला देखील आहे. मात्र त्यांच्या घरच्यांची गाडी पुन्हा ‘जाती’कडे वळत असल्याने घरच्यांचे मन वळवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
जातीचा विचार न करता लग्न करण्याच्या मानसिकतेमागे अनेक कारणे असल्याचे सांगितले जात आहे. कोणाला स्वत:च्या जातीत पसंतीचा जोडीदार मिळत नाही. कुटुंबीयांच्या अवास्तव अपेक्षा असतात. जातीबाहेरचा जोडीदार करायचा हे अनेकांनी आधीच पक्के केलेले असते. अपेक्षांच्या ओझ्यामुळे अनेकांचे लग्नाचे वय उलटून चालले आहे. अशी काही कारणे आहेत.
चौकट
“मी विवाहनोंदणी संकेतस्थळावर नाव नोंदविले. तिथे एका मुलीचे प्रोफाईल मला आवडले. आम्ही एकमेकांशी संपर्क साधला. मला ती मुलगी आवडली. मी लग्न करण्यासाठी जातीची चौकट ठेवलेलीच नव्हती. माझ्या कुटुंबीयांना तिची जात-धर्म सांगितली. तेव्हा ‘कुठल्याही जातीची मुलगी कर’, असे आधी सांगणारे घरचे लोक नंतर अचानक विरोध करू लागले. पण मी तिच्याशीच लग्न करण्यावर ठाम आहे. सध्या कुटुंबाचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
-समीर कोळी (नाव बदललेले)