पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेले सुमारे १ हजार ६२० बालकांची आता पर्यंत नोंद झाली आहे. पालक नसल्यामुळे या सर्व बालकांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यापैकी एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यांची पूर्ण खबरदारी संबंधित यंत्रणेने घ्यावी,असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी यंत्रणेला दिले.
शिक्षणाधिकारी यांनी यासाठी सर्व तालुका स्तरावर बालकांची माहिती संकलित करुन त्यांना सर्व शैक्षणिक सोयी सुविधा देण्यासाठी युध्द पातळीवर काम करावे. तसेच पालक त्याची शाळेची फीस भरण्यासं असक्षम असल्यास त्याबाबत महिला व बाल विकास विभाग विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याकरीता शाळेकडून सहकार्य मिळण्यासाठी शिक्षण विभाग यांनी समन्वय करण्याबाबत निर्देश दिले. तसेच ज्या बालकांचे दोन्ही पालक गमावले आहेत अशा बालकांचे समुपदेशन करण्यात यावे. शासकीस मदत मिळण्यासाठी दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची त्यांच्या घराजवळील बँकेत खाते उघडण्यात यावे. त्याकारीता जिल्हा कार्यालायाकडून सबंधित बँक अधिकारी सूचना देण्यात यावे. तसेच ज्या बालकांचे दोन्ही पालक दगावले आहेत अशा बालकांचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश दिले.
बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृतीदलाची (टास्क फोर्स) बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी डॉ. राजेश देशमुख बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद व कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.