नगारे घुमू लागले पण अजून आव्वाजाचा घोळ कायम....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 01:36 PM2019-03-14T13:36:04+5:302019-03-14T13:49:46+5:30
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघासाठी युतीचे समन्वयक म्हणून बापट तसेच शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती झाल्याचे वृत्त बुधवारी सकाळी जाहीर झाले. त्यानंतर त्यांच्या गोटात बरीच खळबळ उडाली.
पुणे: आचारसंहिता लागू झाल्यामुळे पुण्यात निवडणूकीचे नगारे घुमू लागले आहेत, मात्र कोणत्याही पक्षाचा उमेदवारच अजून निश्चित नसल्याने कार्यकर्ता स्तरावर नुसत्याच चर्चा झडत आहेत. काँग्रेस व भाजपा या दोन्ही प्रमुख पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी मात्र कार्यकर्त्यांना जागते ठेवण्यासाठी बैठका, मेळावे, भेटीगाठी यांचा धडाका उडवून दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व भाजपा बरोबरच्या शिवसेनेत उमेदवार तर जाहीर होऊ द्या म्हणून थोडीफार शांतताच दिसत आहे.
भाजपाने संघटना स्तरावर गेला महिनाभर वेगवेगळ्या उपक्रमांचा धडाकाच उडवून दिला होता. त्यांच्याकडून विद्ममान खासदार अनिल शिरोळे व पालकमंत्री गिरीश बापट या दोघांमध्ये चूरस आहे. शिरोळे यांनी त्यांनी भर दिला असून शहरातील वेगवेगळ्या स्तरांमधील प्रमुख लोकांबरोबर त्यांनी आपला मुलगा सिद्धार्थ याच्या माध्यमातून संवाद साधण्यास सुरूवात केली आहे. स्वत:च्या उमेदवारीबाबत अद्यापपर्यंत एकदाही त्यांनी जाहीरपणे कोणतेही वक्तव्य केलेले नाही, मात्र उमेदवारी पक्की असल्याप्रमाणे शांतपणे त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे.
बापट यांनी उमेदवारीमधील आपला रस लपवून ठेवलेला नाही, मात्र पक्ष देईल तो आदेश आपल्याला मान्य आहे अशीच भूमिका त्यांनी कायम घेतली आहे. स्थानिक स्वरूपाच्या राजकारणातून राज्याच्या राजकारणात आमदार म्हणून पाच टर्म काढल्यानंतर आता खासदार म्हणून राष्ट्रीय राजकारणात काम करायला आवडेल असे ते सांगतात. त्यांनीही आपल्या निकटच्या खास लोकांच्या माध्यमातून चांगली मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील आपला मुक्काम वाढवला असून तेही भेटीगाठींवर भर देत आहेत.
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघासाठी युतीचे समन्वयक म्हणून बापट तसेच शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती झाल्याचे वृत्त बुधवारी सकाळी जाहीर झाले. त्यानंतर त्यांच्या गोटात बरीच खळबळ उडाली. उमेदवारी मिळणार की नाही अशी शंका त्यामुळे व्यक्त होऊ लागली. मात्र बुधवारीच रात्री पालिकेतील पक्षाच्या सर्व नगरसेवकांसाठी भोजनाचा कार्यक्रम ठेवून बापट यांनी अजूनही आपण स्पर्धेत असल्याचे दाखवून दिले.
काँग्रेसमध्येही उमेदवारीबाबत अजूनही अनिश्चितता आहे. त्यामुळे कार्यकर्ते चिंतेत आहेत. माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अॅड. अभय छाजेड, अरविंद शिंदे व पक्षाबाहेरून प्रविण गायकवाड, संजय काकडे यांची नावे चर्चेत आहेत. बाहेरून उमेदवार लादला जाण्याची चर्चाच काँग्रेसभवनमध्ये गेले काही दिवस सुरू आहे. त्यांनीही संघटनेच्या स्तरावर आचारसंहिता नियम, प्रचारनियोजन अशा कार्यशाळांचे आयोजन सुरू ठेवून कार्यकर्ते जागे ठेवण्याचा प्रयत्न चालवला आहे.
...........
युतीमध्ये भाजपाबरोबर शिवसेना व काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आहे. उमेदवार जाहीर झाल्यानंतर प्रचाराला लागू असे म्हणत या दोन्ही प्रमुख घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अजूनतरी शांतच आहेत. युती व आघाडी म्हणून त्यांच्या एकत्रित बैठकांनाही अजून सुरूवात झालेली नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते घटक पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात किती सक्रिय होतील याची शंका यावी इतपत शांत वातावरण दोन्ही पक्षात आहे.