अभिजित कोळपे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्हा परिक्षेत्रातील औद्योगिक वसाहतीतील एकही कंपनी प्रदूषण करत नाही, असा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, एकट्या पुणे शहरातील मुळा-मुठा आणि भीमा खोऱ्यातील जवळपास सगळ्याच नद्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. काही वर्षांपूर्वी खळाळणाऱ्या या नद्या मग आता आपोआप प्रदूषित होऊ लागल्या का, असा प्रश्न पुणेकरांनी उपस्थित केला आहे.
पुणे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार क्षेत्रात पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा येतो. तर उपप्रादेशिक कार्यालय अंतर्गत पुणे महापालिका क्षेत्र, पिंपरी-चिंचवड महापालिका (भोसरी, पिंपरी, आकुर्डी एमआयडीसी क्षेत्र), हवेली, खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, मुळशी, मावळ, पुरंदर, दौंड, इंदापूर, बारामती, भोर, वेल्हा आदी पुणे जिल्ह्यातील कार्यक्षेत्र आहे. या ठिकाणी असलेल्या औद्योगिक कारखान्यातून सर्रासपणे नाला अथवा नदीपात्रात कोणतीही प्रक्रिया न करता काही कंपन्या थेट सांडपाणी सोडत आहे.
यामुळे आळंदी, खेड, चाकण, शिरूर, दौंड नगरपरिषद तर मांजरी, थेऊर, उरुळी कांचन ग्रामपंचायत तसेच नदीकाठच्या अनेक गावांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. तसेच औद्योगिक वसाहतीतील ज्या कंपन्या दूषित सांडपाणी नाल्यातून अथवा नदीत सोडत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. मात्र, त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचे येथील नागरिक, सामाजिक संघटना तसेच पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या नद्यातील दूषित पाणी शेतीसाठी देखील वापरता येत नाही. इतके प्रदूषित आहे. हे प्रदूषित पाणी पिल्यामुळे अनेक मुकी जनावरे मागील काही वर्षांत मृत पावली आहेत. मात्र, तरीही या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेला दावा किती खरा मानायचा, हे आता नागरिकांनीच ठरवायचे आहे.
------
उत्तर द्या... अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात आंदोलन करणार
दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न बिकट होत आहे. जिल्ह्यातील अनेक भाग पाण्यासाठी तीव्र आंदोलन करत आहेत. जे पाणी सध्या उपलब्ध आहे, तेही कंपन्या प्रदूषित करत आहे. मग या पार्श्वभूमीवर पुणे प्रदूषण नियंत्रण मंडळ नक्की काय काम करते आहे, तुम्ही नक्की कशाच्या आधारे एकही कंपनी प्रदूषण करत नाही याचे उत्तर द्यावे, अन्यथा मंडळाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव, कर्तव्य जनमंचचे प्रमोद देवकर, शिवशाही फाउंडेशनचे श्रीधर गलांडे यांनी दिला आहे.
------
कोट
आमच्याकडे ज्या कंपन्या नोंदणीसाठी येतात. त्यांना पाणी शुद्धीकरण प्लांट बसवल्याशिवाय आम्ही प्रमाणपत्र देत नाही. सद्य:स्थितीत नोंदणी असलेली एकही कंपनी दूषित पाणी नदीपात्रात सोडत नाही. तसेच नोंदणीकृत नाही पण ज्या कंपन्या दूषित सांडपाणी नदीपात्रात सोडतात, अशा कंपन्यांची तपासणी करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही. ज्या कंपनीची तक्रार येईल. त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल.
- नितीन शिंदे, प्रादेशिक अधिकारी, पुणे प्रदूषण नियंत्रण मंडळ
-----
कोट
पुण्यातील अनेक सोसायट्या, बंगले यांनी त्यांच्या येथे निर्माण होणारे सांडपाणी थेट नाल्यात सोडले आहे. त्यामुळे आधी नाले स्वच्छ करावे लागेल. त्यानंतर नदी स्वच्छ करावी लागेल. महापालिकेचे शुद्धीकरण केंद्रे प्रक्रिया न करताच मैलापाणी रात्रीच्या वेळी थेट नदीत सोडत आहेत. लोकसंख्येवर कोणतेही नियंत्रण नाही. एफएसआय वाढवून अनेक इमारती बांधत आहेत. हे सगळे प्रशासन आणि राजकारण्यांच्या संगनमताने सुरू आहे. नदीतील हे सांडपाणी खाली नदीकाठच्या शेतीला देखील वापरण्यायोग नाही. इतके वाईट आहे. तसेच आपणच केलेल्या नदी प्रदूषणामुळे वेगवेगळे साथीचे आजार उद्भवत आहेत. याकडे सर्वांनीच गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
- सारंग यादवाडकर, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते
-----
पॉईंटर्स
* पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात फक्त ९ ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते.
* पुणे शहराची लोकसंख्या ६० लाखांच्या पुढे गेली.
* दररोज ७५० दशलक्ष लिटरपेक्षा अधिक सांडपाणी एकट्या पुणे शहरात निर्माण होते.
-----
शुद्धीकरणापूर्वीच मैलापाणी थेट नदीत
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरील प्रसिद्ध केलेल्या अहवालात मुळा-मुठा नदीपात्रातील पाण्याचे नमुने अत्यंत वाईट असल्याचे म्हटले आहे. कारण, शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून सांडपाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रात सोडण्याऐवजी थेट मुळा-मुठा नदी पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदीतील पाणी अत्यंत वाईट आहे.
--------
हजारो कोटी रुपये पाण्यात
नदीमध्ये सांडपाणी जाऊ नये म्हणून पुणे महापालिकेने वेगवेगळ्या ९ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारली आहेत. यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, या केंद्रातील सांडपाणी पुन्हा नदीत येत आहे. त्यामुळे ही केंद्रे फक्त नावालाच असल्याचे पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.
----
वैकुंठ स्मशानभूमीतील वायू प्रदूषणाने जीव गुदमरला
नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत मृतदेह जाळल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण निर्माण होत आहे. त्यामुळे नवी पेठ, सदाशिव पेठ, दांडेकर पूल वसाहत परिसरातील नागरिकांचा जीव गुदमरत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही पुणे महापालिका प्रशासन ठोस पावले उचलत नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.