लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उरुळीकांचन येथील शैला रामचंद्र मोरे यांची एक लाख २१ हजार ३९८ रुपयांची घरपट्टी थकीत आहे. ही रक्कम न भरल्याने त्यांचे प्रकरण लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आले होते. त्याबाबतची नोटीस त्यांना शनिवारी सकाळी मिळाली. त्यामुळे त्या घाईने न्यायालयात दाखल झाल्या. लोकअदालतीत तडजोड करून संबंधित रक्कम कमी करण्याबाबत त्यांनी विनंती केली. मात्र, त्याला कोणतीच दाद न मिळाल्याने त्या निराश होऊन परत घरी आल्या. त्यांच्यासारखाच अनुभव घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी आलेल्या अनेकांना आला.
माझी पूर्वी कधीही घरपट्टी प्रलंबित राहिली नाही. मात्र, कोरोनामुळे मी ती भरू शकले नाही. एक लाख २१ हजार रुपये घरपट्टी भरण्याची नोटीस मिळाल्यानंतर लगेच न्यायालय गाठले. घरात आजारपणासाठी पैसे नसताना आता एवढी घरपट्टी मी कुठून भरणार? लोकअदालतीत तडजोड होऊन घरपट्टी कमी होईल, असे वाटले होते. मात्र, ते देखील झाले नाही, असे शैला रामचंद्र मोरे यांनी सांगितले.
-----
न्यायालयाने विनंती करून देखील ग्रामपंचायतीमधील अधिकारी-पदाधिकारी यांनी थकबाकीदारांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. तडजोड करण्याचे आम्हाला शासनाकडून आदेश नाही, असे त्यांनी न्यायालयास सांगितले. थकबाकी पूर्ण माफ करा, अशी कोणाची मागणी नाही. मात्र, रकमेत तडजोड व्हायला हवी, अशी पक्षकारांची इच्छा आहे.
- ॲड. स्मिता पाडोळे, जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या वकील