पुणे - मिलिंद तेलतुंबडे हा माझा लहान भाऊ असला तरी मागील ३८ वर्षे त्याच्याशी कसलाही संपर्क नाही. तो कुटुंबाचा एक सदस्य असला म्हणून थेट त्याच्या चळवळीशी संबंध जोडणे खेदजनक आहे. एल्गार परिषदेशीही काही संबंध नाही. देशात सध्या कायद्याचे राज्य नसून राज्यकर्त्यांना जे काम करायचे ते करत आहेत. बनावट पुरावे तयार करून मला अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे फॅसिझम आहे. यामागे नेमका सूत्रधार कोण आहे, हे त्यानांच माहित असेल, अशा शब्दांत डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी संताप व्यक्त केला.विशेष न्यायालयाने अटक बेकायदा ठरवून सुटका केल्यानंतर तेलतुंबडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करून ते म्हणाले, पोलिसांनी हा सर्व बनाव रचला आहे. मी १९८१-८२ मध्ये गुजरातमध्ये आयआयएममध्ये असताना मिलिंदचा नक्षली चळवळीशी संबंध आला. याला ३८ वर्षे झाली. त्यानंतर आमचा कधीही संपर्क आला नाही. त्याच्या चळवळीशी आमचा संबंध जोडणे चुकीचे आहे. एल्गार परिषदेसाठी आलेले माझे मित्र व नातेवाइकांना परिषदेआधी भेटलो. पण त्यानंतर गोव्याला गेलो. परिषदेत काय झाले, याची माहिती नव्हती. भीमा कोरेगावला घडलेला प्रकारही नंतर कळाला. अशा परिषदा घातक ठरू शकतात, यावर लेख लिहिला. त्यावर देशभरातून अनेक विरोधी प्रतिक्रिया उमटल्या. देशात सध्या कायद्याचे राज्य नाही. कायद्याचे राज्य असते तर या घटनांची भीती वाटली नसती. पण राज्यकर्ते जे करायचे ते करत आहेत. संपूर्ण यंत्रणा आपल्याविरोधात कारस्थान करत असल्याने भीती वाटत आहे. माझ्या विरोधात पोलीसांनी ईमेलचे पुरावे दिले असले तरी, ईमेल खोटे तयार केले जाऊ शकतात. पुरावेही बनावट तयार करून मला अडकविले जात आहे. त्यामुळे न्यायालयात त्याची प्रामाणिकता सिध्द होईल.
मिलिंदशी ३८ वर्षे कसलाही संपर्क नाही - आनंद तेलतुंबडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 5:24 AM