पुणे - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. एकीकडे राज्यात या निकालाची सर्वत्र चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस बजवण्यात आली आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, चौकशीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती जयंत पाटील यांनी ईडीला पत्र देऊन केल्याची माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी मला माहिती नसल्याचे म्हटलं आहे.
इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) या कंपनीत झालेल्या कथित आर्थिक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस जारी केली असून, त्यांना १२ मे रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र, चौकशीसाठी हजर राहण्यास मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती जयंत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात मला माहिती नाही, माझा आणि जयंतरांचा कॉन्टॅक्ट झाला नाही, असेही त्यांनी सांगितले.
माझा जयंतरावांशी काही कॉन्टॅक्ट झाला नाही, आम्ही फलटणला अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला एकत्र होतो. रामराजेंच्याकडे एकत्र जेवणही केलं, तोपर्यंत काहीही नव्हतं. मला ईडीच्या नोटीससंदर्भात माहिती नाही, मी त्यांच्याकडून माहिती घेऊन याबाबत सांगेन. कारण, आम्हालाही यापूर्वी वेगवेगळ्या लोकांना नोटीस आल्या आहेत, माझ्यासंदर्भातही काहींना आल्या होत्या. शेवटी, वेगवेगळ्या तपास संस्था असतात, जसं की सीबीआय, ईडी, एनआए, आयटी, एसीबी, सीआयडी असेल या सर्व संस्थांना चौकशीचा अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करुन त्यांच्याकडून चौकशी होत असते. त्यांच्याकडून आलेल्या नोटीसला उत्तर देणं हे नोटीस आलेल्यांचं काम असतं. त्यानुसार, जयंतराव पाटील हेही नोटीसला उत्तर देतील, असे अजित पवार यांनी म्हटले.
चौकशीसाठी मुदत वाढवून द्यावी
आयएल ॲण्ड एफएस या संस्थेशी माझा कोणताही संबध नाही. त्यांच्याकडे कधी कर्ज मागण्यासाठी गेलेलो नाही. आता नोटीस प्राप्त झाली आहे तर चौकशीला सामोरा जाईन. पण सध्या जवळच्या लोकांची लग्न आहेत. त्यामुळे दोन-तीन दिवसांनी चौकशीसाठी येईन, असे पत्र ईडीला पाठविले आहे. ईडी नोटीस का पाठवते हे देशाला माहिती आहे. त्यामुळे आत्ताच नोटीस का आली, याचे मला आश्चर्य वाटत नाही. मला का लक्ष्य करण्यात आले हे समजत नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.