संजय माने, पिंपरीसोशल मीडियाचा वापर करताना योग्य ती दक्षता घेणे आवश्यक असताना, व्हॉट्सअॅपवर जातीय तेढ निर्माण करणारा, तसेच सामाजिक सुरक्षिततेला धोका पोहोचविणारा मजकूर टाकला जात आहे. एखाद्या मुद्द्यावर आपले मत नोंदविण्याइतपतच्या कॉमेंट्स देण्याबद्दल कोणी हरकत नोंदविणार नाही. परंतु, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हॉट्सअॅपवर टाकून ही पोस्ट अनेकांना टाका, धर्माचा अभिमान बाळगणारेच ही पोस्ट ग्रुपवर इतरांना शेअर करतील, पोस्ट शेअर करण्यासाठी मनगटात जोर असायला हवा, असे चिथावणीखोर आवाहनसुद्धा केले जाते. अशा प्रकारचे कृत्य सायबर कायद्यांतर्गत दखलपात्र गुन्हा ठरू शकते. असे असताना कायदा, सुव्यवस्थेला बाधक ठरू शकणाऱ्या या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. सोशल मीडिया वापरताना धार्मिक, जातीय भावना दुखावल्या जातील असा मजकूर, छायाचित्र, व्हिडिओ क्लिप, तांत्रिक क्लृप्त्या करून बदल केलेली छायाचित्रे तयार करून पोस्ट करणे, लाइक करणे, शेअर करणे, कॉमेंट करणे, फॉरवर्ड करणे, प्रसारित करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. असे जनहितार्थ आवाहन करून पोलीस मोकळे झाले आहेत. परंतु, प्रत्यक्षात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हॉट्सअॅपवर फिरत असताना नियंत्रणासाठी कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी, सोशल मीडियाचा कसाही वापर केला, तरी काही होत नाही, असा समज तरुणांमध्ये निर्माण झाला असून, त्यांच्याकडून अशी कृत्ये सर्रासपणे केली जात आहेत. पोलिसांच्या संकेतस्थळास भेट दिली असता, होम पेजवर सोशल मीडियाच्या वापराबाबत घ्यावयाच्या दक्षतेचे आवाहन दिसून येते. काय करावे, काय करू नये हे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. सायबर कायद्यांतर्गत या गुन्ह्यांसाठी असलेली शिक्षेची तरतूद याविषयीसुद्धा माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी बैठका घेऊन सोशल मीडियाच्या वापराबाबत जनजागृती केली आहे. असे असताना व्हॉट्सअॅपवर नवनवे ग्रुप तयार होत असून, त्यावर धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या मजकुराच्या पोस्ट राजरोसपणे प्रसारित होत आहेत.एखाद्या व्यक्तीचे एडिट केलेले छायाचित्र, जोडप्याचे छायाचित्र गंमत म्हणून सोशल मीडियावर पसरवले जाते. एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी, पर्यटनस्थळी गंमत म्हणून कोणाचेही छायाचित्र काढून सोशल साइटवर अपलोड करण्याचेही प्रकार घडतात. विशेषत: तरुणींची छायाचित्रेकाढली जातात. त्या छायाचित्रांचा गैरवापर केला जातो. अशा विकृतीही घडू लागल्या आहेत. विकृत कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांच्या सायबर सेलच्या माध्यमातून कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. चार महिन्यांपूर्वी सांगवीत माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होण्याच्या घटना घडल्या आहेत.
‘सोशल मीडिया’च्या गैरवापरावर नाही नियंत्रण
By admin | Published: May 13, 2015 2:57 AM