डॅशबोर्डवर रुग्णालयांकडून माहिती अद्ययावत नाही : महापालिका आणि डॅशबोर्डवरील गंभीर रुग्णांच्या आकडेवारीत साम्य कसे?
प्रज्ञा केळकर-सिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डवरील माहिती अनेक रुग्णालयांनी मागील काही दिवसांपासू ‘अपडेट’च केलेली नाही. महापालिकेचा दैनंदिन अहवाल आणि डॅशबोर्डवरील संख्याही सारखीच दिसत आहे. एकीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होत असताना गंभीर रुग्णांची टक्केवारी महिन्याभरात पावणेआठ टक्कयांवरुन पावणेदहा टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे आकडेवारीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
नायडू हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, सिंबायोसिस हॉस्पिटल अशा अनेक महत्वाच्या रुग्णालयांनी डॅशबोर्डवरील माहिती अपडेट केलेली नाही. शहरांमधील बेडची उपलब्धता जाणून घेण्यासाठी नागरिक या डॅशबोर्डचा आधार घेतात. माहितीच अद्ययावत नसल्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दैनंदिन अहवाल दररोज सर्व रुग्णालयांशी फोनवरुन संपर्क करुन अपडेट केला जातो, असा दावा केला जात आहे. मात्र, आॅक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड यांची उपलब्धता महापालिका अहवाल आणि डॅशबोर्डवर सारख्याच प्रमाणात दिसत आहे. मग, नेमकी कोणती माहिती अपडेट केली जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नायडू रुग्णालयात सध्या साधारणपणे ५० कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, डॅशबोर्डनुसार ही संख्या १५५ असल्याचे दिसत आहे. सिंबायोसिस हॉस्पिटलमध्ये सध्या १२ रुग्ण उपचार घेत असून, डॅशबोर्डवर ही संख्या ३० दाखवली जात आहे.
---------------------
डॅशबोर्डवरील माहिती अपडेट करणारे कर्मचारी आपापल्या मूळ विभागात परत गेले आहेत. त्यामुळे डॅशबोर्ड अपडेट करण्याचे काम मागे पडले आहे. पुढील दोन-तीन दिवसांमध्ये प्राधान्याने हे काम मार्गी लावले जाईल.
- सुरेश जगताप, अतिरिक्त आयुक्त
----------------------
महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दैनंदिन अहवाल दररोज रुग्णालयांशी संपर्क साधून डेटा संकलित करुन तयार केला जातो. काही रुग्णालये डॅशबोर्डवर माहिती अपडेट करत नाहीत. त्यामुळे फोनवरुन माहिती घेऊन आकडेवारी प्रसिध्द केली जाते.
- डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
----------------------
गंभीर रुग्णांची आकडेवारी :
एकूण रुग्ण गंभीर रुग्ण टक्केवारी
१ डिसेंबर ५३९६ ४०८ ७.५६
१५ डिसेंबर ४९५० ३७३ ७.५३
२७ डिसेंबर ४०९७ ३८७ ९.४४
------------------------------
रुग्णसंख्या डॅशबोर्ड महापालिका
आयसीयू (व्हेंटिलेटरसह) २२६ २२४
आयसीयू (व्हेंटिलेटरशिवाय) १६१ १६१
आॅक्सिजन ८५८ ८४४