पुणे: पुण्यात सलग दुसरा दिवस कोरोनामुक्तीचा ठरला आहे. गुरुवारी शहरातील एकाही कोरोनाबाधितचा मृत्यू झालेल्या नाही. तर गुरुवारी झालेल्या 5 हजार 710 तपासण्यापैकी केवळ 79 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी केवळ 1.38 टक्के इतकी आहे. सलग दुसऱ्या दिवशी पुणेकरांनी यमराजाला ठेंगा दाखवत एकाचाही मृत्यू होऊ दिलेले नाही.
शहरात 30 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला मृत्यू झाला होता. त्यानंतर 19 व 20 एप्रिल 2020 या दोन दिवसांचे अपवाद वगळता शहरात दररोज कोरोनाबाधितांचा मृत्यू होत होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 6 फेब्रुवारी 2021 रोजीचा दिवस मृत्यू मुक्त गेल्यानंतर आठ महिन्यानंतर सलग दोन दिवस शहरातील एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.
दरम्यान शहरात उपचारासाठी दाखल झालेल्या पुण्याबाहेरील कोरोनाबाधितांपैकी सहा जणांचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रुग्णसंख्या 984 इतकी झाली आहे. गुरुवारी दिवसभरात 83 जण कोरोनामुक्त झाले आहेत. विविध रुग्णालयांमध्ये सध्या 161 रुग्णांवर ऑक्सिजन उपचार सुरू असून 163 जण गंभीर आहेत. शहरात 30 मार्च 2020 पासून आजपर्यंत 9 हजार 67 जणांचा मृत्यू झाला आहे.