धनकवडी : लसीकरण केंद्रांवर टोकनचा गोंधळ, तासन्तास प्रतीक्षा, लस उपलब्धतेविषयीची अनभिज्ञता आणि एकूणच तोबा गर्दी हे सगळे चित्र शहरातील अनेक लसीकरण केंद्रांवर दिसून येत आहे. मात्र धनकवडी गावठाणात असलेल्या विलासराव तांबे दवाखान्यात लसीकरण केंद्रावर मात्र शांततापूर्ण व सुनियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण होत आहे.
धनकवडीतील लसीकरण केंद्रावर नागरिकांना वेळीच योग्य माहिती मिळेल याची दक्षता घेतल्याचे दिसते. नागरिकांची गर्दी नियंत्रित राखण्यासाठी पुरेशी यंत्रणा येथे सातत्याने कार्यरत आहे.
नागरिकांना आवश्यक असणारी सर्व माहिती विनात्रागा आरोग्य कर्मचाऱ्यांकडून दिली जाते. अनावश्यक गर्दी होऊ नये आणि लोकांना तत्परतेने लस मिळावी, असा प्रयत्न इथे दिसतो. लशींची उपलब्धता लक्षात घेऊन जितक्या लोकांना लस मिळू शकते, तेवढ्याच लोकांना थांबण्यास सांगून अनावश्यक खोळंबा होऊ दिला जात नाही. प्रत्येकाला क्रमाने सोडले जाते. त्यामुळे गोंधळ गडबड होत नाही.
दवाखान्यातील डॉ. अमोल खडके नागरिकांशी बोलतात आणि त्यांना दिलासाही देतात. त्यामुळे या केंद्रावर सुरू असलेल्या लसीकरणाबाबत नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. ज्यांचा लसीकरणाचा पहिला डोस २३ मार्चपूर्वी झालेला होता, अशा ज्येष्ठ नागरिकांना आता येथे प्राधान्याने लस दिली जात आहे. नगरसेवक विशाल तांबे या लसीकरण मोहिमेवर लक्ष आहे.
----------------
पहिल्या लसीलाही त्रास झाला नाही. येथील यंत्रणाही खूप चांगली आहे. सुयोग्य नियोजनामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ दिसत नाही, बैठक व्यवस्था चांगली आहे. माझं वय ६० वर्षांच्या वर असून हा दुसरा डोस आहे. लस घेतल्यानंतर किरकोळ त्रास आला होता. मात्र लस दिल्यानंतरची मेसेजची सिस्टिमही खूप तत्पर आहे.
- सोपानराव चव्हाण, धनकवडी
--------------
प्रत्येकाने लस घ्यायला पाहिजे. आपल्याला या लसीच्या माध्यमातून सुरक्षितता मिळत आहे. वर्षभर आपण सर्वांनीच कोरोनाचा सामना केला आहे. आता लशीच्या रुपाने या साथरोगाला पायबंद घालण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लशीचे दोन्ही डोस आवर्जून घ्यावेत.
- बाळाभाऊ धनकवडे, नगरसेवक
----------------
फोटो ओळ - धनकवडी येथील विलासराव तांबे दवाखान्यात लस घेताना नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे, आरोग्य अधिकारी डॉ. अमोल खडके, परिचारिका मेघना पाटोळे.