पुणे : शहरात कोरोनाबाधितांचा दुपटीचा कालावधी सात दिवसांवर आला असताना, गृह विलगीकरणात राहणाऱ्या (होम आयसोलेशन) रूग्णांवर कोणाचाच अंकुश उरलेला नाही़ स्थानिक प्रशासकीय व्यवस्थेकडून केवळ एवढे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले, होम आयसोलेशचे अमुक एक स्टिकर्स चिटकविले अशा विविध उपाययोजना कागदावर दाखविल्या जात असल्या तरी, प्रत्यक्षात गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारलेले कित्येक रूग्ण हे घराबाहेर बिनधास्त वावरत आहेत.
आज शहरात दिवसाला तीन हजारांच्या आसपास कोरोनाबाधितांची वाढ होत असून, यापैकी अनेक जण गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारत आहेत़ परंतु, यांच्यावर महापालिकेचा कोणताच अंकुश राहिलेला नाही़ किंबहुना त्यांच्या घरावर होम आयसोलेशनचे स्टिकर्स अथवा हातावर शिक्का दिसत नाही़ परिणामी हे रूग्ण शहरात इतरांना आपल्यापासून संसर्ग होईल याची पर्वा न करता बिनधास्त फिरत आहेत़
दरम्यान, अशा बिनधास्त रूग्णांना सीसीसी सेंटरमध्ये ठेवण्यासाठी अद्यापही महापालिकेचे एकही कोविड केअर सेंटर सुरू झालेले नाही़ किंबहुना एकही विलगीकरण कक्ष कार्यरत नाही़ सद्यस्थितीला उपनगरांमध्ये कोरोनाचे रूग्ण सर्वाधिक आढळून येत असून, येथील प्रशासकीय संसर्ग प्रतिबंधात्मक कार्यवाही अतिशय कुचकामी ठरत आहे़ दिवसागणिक येथील रूग्णसंख्या वाढत असतानाही, महापालिका यंत्रणेकडून अमुक एक क्षेत्र कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले जात असले तरी, स्थानिक क्षेत्रीय कार्यालयांकडून पाहिजे तशा पाठपुरावा केला जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत़
---------------------
प्रशासन रस्त्यावर दिसले पाहिजे - महेश झगडे
संसर्गजन्य आजारात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर ९० टक्के काम प्रशासनाने करणे आवश्यक असते़ कोरोना आपत्तीत केंद्र व राज्य शासनाने ही सर्व ताकद अथवा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत़ अशा वेळी महापालिका यंत्रणेने केवळ आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा भार न देता आपल्या अन्य वीस हजार कर्मचाऱ्यांनाही या महामारी प्रतिबंधात्मक कामात पुन्हा सामावून घेतले पाहिजे़ प्रशासनाचे छोटे छोटे घटक करून स्थानिक पातळीवर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे हेच हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाचे आहे़ याकरिता प्रशासन रस्त्यावर दिसले पाहिजे पण त्याचवेळी लोकांचे सहकार्यही तेवढेच महत्त्वपूर्ण राहणार असल्याचे मत महापालिकेचे माजी आयुक्त महेश झगडे यांनी व्यक्त केले़
---------------------