लोणावळा : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीचा मानाचा पालखी मिरवणूक सोहळा 8 एप्रिल रोजी होणार आहे. या पालखी मिरवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची तसेच जुन्या महामार्गावर वाहतूककोंडी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने शुक्रवारी ( 8 एप्रिल 2022) या दिवशी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कार्ला फाटा ते ग्रीन फिल्ड चौक, ग्रीन फिल्ड चौक ते गडावरील पार्किंग व पायथा रस्ता येथे नो व्हेईकल झोन तसेच मुंबईपुणे व पुणेमुंबई हायवे रोडवर कुसगाव बु. टोलनाका, लोणावळा ते वडगाव फाटा वडगाव मावळ दरम्यान अवजड व मोठ्या वाहनांना नो एंट्री घोषित केली आहे.
हा बदल फक्त 8 एप्रिल रोजी एकाच दिवसासाठी असणार आहे. दोन वर्षानंतर देवीची यात्रा भरणार असल्याने राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांची गैरसोय होऊ नये तसेच त्यांना तासंतास वाहतूककोंडी आडकून पडावे लागू नये याकरिता सदरचा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
भाविकांनी व स्थानिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. भाविकांच्या सुविधेसाठी पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. तसेच दारुबंदीची कडक कारवाई सुरु आहे. वेहेरगाव परिसरातील एका दारु विक्रेत्यांनी दारुबंदी आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र उच्च न्यायालयाने ती याचिका खारिज केली आहे. त्यामुळे कार्ला परिसरात 7 ते 9 एप्रिल दरम्यान दारुबंदी लागू असणार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.