वडगाव मावळ (पुणे) : ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच किंवा त्यांचे पतीराज तसेच इतर नातेवाईक ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप करत असल्याने अनेक ठिकाणी वादंग निर्माण होत आहे. यामुळे महिला सरपंचाच्या स्वातंत्र्यातही गदा येते. या प्रकारांमुळे सरपंच, सदस्यांच्या नातेवाइकांनी कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
मावळ तालुक्यात १०३ ग्रामपंचायती असून त्यात महिलाराज सरपंच असलेल्या ५१ ग्रामपंचायती आहेत. यातील बहुतांश ठिकाणी त्यांचे पती किंवा नातेवाईक हस्तक्षेप करतात.
येथे आहे महिलाराज
सुदवडी, माळवाडी, मळवंडी ठुले, आढले खुर्द, वराळे, आपटी, येळसे, मोरवे, कडधे, शिळींब, शिवली, मळवंडी पमा, ओव्हळे, दिवड, चांदखेड, साळुंब्रे, शिरदे, वडेश्वर, कुसवली, धामणे, परंदवडी,नाणे, कांब्रे ना मा, सोमाटणे, नाणोलीतर्फे चाकण, वेहेरगाव, आढे, ताजे, कार्ला, साई, इंगळुन, कशाळ, जांबवडे, नवलाख उंब्रे, वडेश्वर यासह अन्य गावांत महिला सरपंच, आहेत तर काही गावात उपसरपंच आहेत.
शासनाने आरक्षण दिल्याने महिलांना सरपंच व इतर पदाची संधी मिळाली. त्यात काही ठिकाणी पतीराज किंवा नातेवाईक हस्तक्षेप करतात. तो टाळण्यासाठी शासनाने हस्तक्षेप थांबविण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे महिलांना स्वत: काम करता येईल. पतीराज किंवा नातेवाईक हस्तक्षेप केल्यास आम्हीही यापुढे कारवाई करू.
- सुधीर भागवत, गटविकास अधिकारी, मावळ
मावळ तालुक्यातील आंदर मावळ व आदिवासी ग्रामपंचायती आहेत. आदिवासी समाजातील मी उच्चशिक्षित असून शासनाच्या ५० टक्के महिला आरक्षणामुळे सरपंच होण्याचा मान मिळाला. महिलांनी आपल्या कामात पुरुषांना हस्तक्षेप करू देऊ नये.
- छाया हेमाडे, वडेश्वर, सरपंच